Wed, Jul 24, 2019 06:20होमपेज › Pune › उत्पादकांकडून मागणी वाढल्याने मिरची महागली

उत्पादकांकडून मागणी वाढल्याने मिरची महागली

Published On: Jan 26 2018 1:22AM | Last Updated: Jan 25 2018 10:53PMपुणे : प्रतिनिधी

परदेशासह राज्यातील मसाले उत्पादकांकडून मागणी वाढल्याने आठवड्याभरात मिरचीच्या दरात क्विंटलमागे 1 हजार 500 ते 2 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. यंदाच्या वर्षी राज्यासह देशाच्या विविध ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका बसल्याने मिरचीच्या उत्पादनात घट झाली आहे. परिणामी, मार्केटयार्डातील भुसार बाजारात मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने मिरचीच्या दर वधारले आहे. याचा सर्वसामान्य ग्राहकांना चांगलाच झटका बसला आहे. 

मार्केटयार्डातील बाजारात कर्नाटक (ब्याडगी), आंध्र प्रदेश, मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक होते. त्यापाठोपाठ पंजाब, तसेत कोलकत्याहूनही मिरचीची थोड्या प्रमाणात आवक होते. यामध्ये, तेजा, गुंटूर, बेडगी, लवंगी आदी जातीच्या मिरचीचा समावेश आहे. दरवर्षी हंगामादरम्यान एक ते दीड हजार पोती होणारी आवक आज फक्त 200 ते 250 पोती इतकी होत आहे.

मध्यप्रदेशातील मिरचीच्या पिकावर रोग पडल्याने राज्यात अवघे वीस टक्केच उत्पादन झाले आहे़ त्यामुळे तेथील मिरची पुणे मार्केटमध्ये अल्प प्रमाणात विक्रीस आली आहे़ तसेच महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात मिरचीचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते़ मात्र, यंदा पावसाचा हंगाम लांबल्याने तसेच परतीच्या काळातही दमदार पाऊस बरसल्याने मिरचीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान, जिल्ह्यासह राज्यातील मसाले उत्पादकांनी मिरचीचा केलेला साठा संपल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मिरचीची खरेदी करण्यात येत आहे. तसेच परदेशातूनही मागणी वाढल्याने त्याचा परिणाम मिरचीच्या दरावर झाला आहे. असल्याची माहिती फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सचे अध्यक्ष वालचंद संचेती यांनी दिली़