Mon, Apr 22, 2019 03:44होमपेज › Pune › समुपदेशनामुळे मिळणार मुलांना पुन्हा आई-बाबांचे प्रेम

समुपदेशनामुळे मिळणार मुलांना पुन्हा आई-बाबांचे प्रेम

Published On: Aug 28 2018 1:36AM | Last Updated: Aug 28 2018 1:06AMपुणे ः प्रतिनिधी 

दोन चिमुरड्यांचा भवितव्याचा विचार करून दीड वर्षाहून अधिक कालावधीपासून विभक्त राहणारे पती पत्नी पुन्हा एकत्र आले. मुलाला आई-वडिलांचे प्रेम, एकत्र सहवास मिळणे आवश्यक असल्याचे समुपदेशनातून दोघांना पटवून देण्यात आले. त्यामुळे संसाराची विस्कटलेली घडी पुन्हा जुळविण्यात आल्याने मुलांनाही आई-बाबांचे पुन्हा प्रेम मिळण्याचे रस्ते मोकळे झाले आहेत. 

27 मे 2013 रोजी दोघांचा विवाह झाला. तो खासगी नोकरी करतो, तर ती शासकीय सेवेत आहे. तिची वेगवेगळ्या जिल्ह्यात बदली होत असते. दोघांना मुले आहेत. घरगुती कारणावरून दोघांत वाद निर्माण झाले. वाद इतके विकोपाला गेले की, दोघे जानेवारी 2017 पासून विभक्त राहू लागले. मूलं तिच्याकडे होते. मे 2017 मध्ये तिने घटस्फोट मिळावा, यासाठी येथील कौटुंबीक न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यानंतर तिने त्याला बाळास भेटू देण्यास विरोध केला. त्यानंतर तिचे समुपदेशन करण्यात आले. त्यावेळी तिने त्याला बाळास भेटण्यास परवानगी दिली. 

दरम्यान, कौटुंबीक न्यायालयात दाखल दाव्याच्या तारखा पडू लागल्या. मात्र, नोकरी करत असल्याने हजर राहण्यास दोघांना जमत नव्हते. त्यामुळे त्यांनी एकत्र येत परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. 

दोघे 21 ऑगस्ट 2018 रोजी कौटुंबीक न्यायालयातील न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या न्यायालयात हजर राहिले. त्यावेळी या खटल्यात समुपदेशन केल्यास दोघे पुन्हा एकत्रित राहू शकतात, असे अभ्यास केल्यानंतर काफरे यांच्या लक्षात आले. त्यांनी स्वत: आणि विवाह समुपदेशक विद्या चव्हाण यांनी दोघांचे समुपदेशन केले. त्यामध्ये त्यांच्यातील गैरसमज आणि मतभेद दूर झाले. एकत्र येत गुण्यागोविंदाने संसार करण्याचे दोघांनी मान्य केले.