Sun, Jan 20, 2019 08:14होमपेज › Pune › चाकणमध्ये शाळकरी मुलाचा खून

चाकणमध्ये शाळकरी मुलाचा खून

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 16 2018 1:23AMराजगुरुनगर : वार्ताहर

शाळकरी मुलावर सहा ते सात जणांनी धारदार हत्यारांनी वार करून खून केला; तर त्याच्या साथीदारावर गंभीर वार करण्यात आल्याची घटना चाकण (ता. खेड) येथील चक्रेश्वर रस्त्यावरील संग्रामदुर्ग किल्ल्याच्या आवारात गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. 

अनिकेत संदीप शिंदे (16, रा. पानसरे मळा, चाकण) असे खून झालेल्याचे नाव आहे, तर त्याचा साथीदार ओंकार मनोज बिसनारे (17, रा. चाकण पोस्ट ऑफिसजवळ) याच्यावर गंभीर वार करण्यात आले असून, त्याच्यावर चाकण येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर सर्व हल्लेखोर पसार झाले असून, जखमी बिसनारे याचा जबाब नोंदवून हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री सुरू होती. 

चाकण पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अनिकेत व ओंकार यांचे काही महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून इतरांशी भांडण झाले होते. त्याच रागातून वरील दोघांना त्यांच्याच मित्रांनी रात्री फोन करून संग्रामदुर्ग किल्ल्यात बोलावून घेतले. अनिकेत आणि ओंकार एकाच दुचाकीवरून त्या ठिकाणी गेले असता सहा ते सात जणांनी त्यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी सपासप वार केले. 

अनिकेतच्या मानेवर अत्यंत खोलपर्यंत वार झाल्याने तो जागेवरच रक्‍ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याला ठार केले. ओंकार याच्यावरही धारदार हत्यारांनी वार झाले. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून निघून गेले. जखमी ओंकारला तातडीने येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनिकेतचा मृतदेह चाकण ग्रामीण रुग्णालयात आणला असून, रुग्णालयात नातेवाईक आणि तरुणांचा मोठा जमाव जमल्याने तणावपूर्ण वातावरण झाले आहे. 

पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी करून हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचे चाकण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव व सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांनी सांगितले.