Wed, Jul 24, 2019 12:03होमपेज › Pune › चिमुरडीवर अत्याचार; शिक्षकाला सक्तमजुरी

चिमुरडीवर अत्याचार; शिक्षकाला सक्तमजुरी

Published On: Apr 26 2018 2:03AM | Last Updated: Apr 26 2018 1:33AMपुणे : प्रतिनिधी  

खासगी शिकवणीसाठी जात असलेल्या आठ वर्षांच्या चिमुरडीवर लैगिंक अत्याचार करणार्‍या शिक्षकाला न्यायालयाने 10 वर्ष सक्‍तमजुरी आणि 16 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी सुनावली आहे. 

विल्सन सिगामनी डॉसन (वय 45, रा. श्रावस्तीनगर, घोरपडी) असे शिक्षा देण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी 8 वर्षीय पीडित मुलीच्या आईने खडक पोलिसांत फिर्याद दिली होती. हा सर्व प्रकार जुलै ते सप्टेंबर 2016 दरम्यान डॉसन शिकवणी घेत असलेल्या ठिकाणी घडला.    डॉसन हा खासगी पद्धतीने त्यांच्या घरी पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची शिकवणी घेत. पीडित मुलगी दोन वर्षांपासून त्याच्याकडे शिकवणीसाठी जात. दरम्यान तीन महिन्यांपासून पीडितेला पोट दुखीचा त्रास होत होता. तसेच पीडिता  शिकवणीसाठी जाताना खूप रडत. तसेच तिने क्लासला न जाण्याचा हट्ट धरला होता.

त्यामुळे तिच्या आईने क्लासला न जाण्यामागचे कारण विचारले असता हा प्रकार समोर आला. त्यावरून तिच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल दिली होती. याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्यात अतिरीक्त सरकारी वकील सुरेश गवळी यांनी याप्रकरणी 6 साक्षीदार तपासले. त्यातील मुलीची साक्ष आणि वैद्यकीय पुरावे महत्त्वाचे ठरले. मुंढवा पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक अनिता खेडकर-रासकर यांनी या गुन्ह्याचा तपास केला. तर पोलिस कर्मचारी बापू शिंदे यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.

अ‍ॅड. गवळी यांनी याप्रकरणी आरोपीने शिक्षकी पेशाला काळीमा फासला असून त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. त्याला शिक्षा झाल्यास असा गुन्हा करताना कोणी धजावणार नसल्याचेही न्यायालयात सांगितले. तर बचाव  पक्षाच्या वतीने क्‍लासची फी न दिल्याने हे मुलीच्या वतीने हे आरोप करण्यात येत असल्याचा बचाव करण्यात आला; परंतु, सरकारी पक्षाने सादर केलेल्या पुरावे आणि साक्षीसमोर हा बचाव टिकू शकला नाही.