Fri, Jul 19, 2019 07:12होमपेज › Pune › मुख्यमंत्र्यांची चिंचवडची सभा उधळणार : मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुख्यमंत्र्यांची चिंचवडची सभा उधळणार : मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

Published On: Jul 22 2018 1:10AM | Last Updated: Jul 22 2018 1:06AMपिंपरी: प्रतिनिधी 

मराठा आरक्षणाची मागणी करूनही मागणी पूर्ण करण्यात आली नाही. राज्यभरात 58 मोर्चे काढूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याचे गांभीर्य नाही. समाजाला आश्वासनावरच ठेवले आहे. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून चिंचवड येथील मुख्यमंत्र्यांची सभा उधळवून लावणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आला. 

प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले की, सकल मराठा समाजाची आरक्षणाची मागणी अनेक वर्षे प्रलंबित आहे. या मागणीसह इतर मागण्यांसाठी 9 ऑगस्ट 2016 पासून मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून 58 मोर्चे शांततेच्या मार्गाने काढण्यात आले. या मागण्यांबाबत राज्य सरकारने गाजर दाखविण्याचे काम केले. मराठा समाजाला त्वरीत न्याय दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्याचा विसर त्यांना पडला आहे.

त्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही. त्यामुळे मराठा समाजात असंतोष आहे. याचा परिणाम म्हणून परळी येथे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. समाजाला न्याय देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चिंचवड येथे चापेकर स्मारकाचे उद्धाटन व प्रस्तावित सभेचे आयोजन केले. मराठा समाजाच्या मागण्या पुर्ण न केल्याच्या निषेधार्थ त्यांची ही सभा उधळवून लावणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला.