Fri, Aug 23, 2019 23:56होमपेज › Pune › पिंपरी-चिंचवड पालिकेच्या गैरव्यवहाराबाबत मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश

पिंपरी-चिंचवड पालिकेच्या गैरव्यवहाराबाबत मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश

Published On: Feb 03 2018 2:16AM | Last Updated: Feb 03 2018 1:17AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 425 कोटी खर्चाच्या रस्ते विकासकामांची निविदा, आठ महिन्यांत भरमसाट ‘टीडीआर’ वाटप आणि पंतप्रधान आवास योजनेच्या निविदा प्रकल्पांची चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत. त्या प्रकरणी शिवसेनेचे खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केली होती. त्यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. 

खा. आढळराव पाटील यांनी महापालिकेतील विविध गैरव्यवहारांबाबत मुख्यमंत्र्यांकडे वेळोवेळी तक्रार केली आहे. समाविष्ट गावांतील 425 कोटी रुपये खर्चाच्या कामांमध्ये ‘रिंग’ होऊन 90 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार त्यांनी केली होती. 

यामध्ये भाजपाचे पदाधिकारी, अधिकारी व ठेकेदारांनी संगनमत केले आहे. सदर निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्याची मागणी त्यांनी केली होती. 

महापालिकेने मागील आठ महिन्यांत तब्बल 41 लाख 27 हजार चौरस फुटांचा ‘टीडीआर’ वाटप केला आहे. त्याची किंमत 5300 कोटी असून, यामध्ये आयुक्त व भाजपाचे पदाधिकारी यांचा सहभाग असल्याचा आरोप केला जात आहे. त्याच्या चौकशीची मागणी खासदारांनी केली होती. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस योजनेतील घरबांधणी प्रकल्पांसाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. 

या तक्रारीची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गैरव्यवहाराबात उचित कारवाई करण्याच्या सूचना प्रधान सचिवांना दिल्या आहेत. तसे पत्र मुख्यमंत्र्यांनी खासदार आढळराव यांना पाठवून कळविले आहे.