होमपेज › Pune › परदेशात शिक्षण घेतले तरी देश विसरू नका : उपराष्ट्रपती (Video)

डॉ. प्रतापसिंह जाधव यांना डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान (Video)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

करिअरमधील प्रगतीसाठी परदेशात जाण्यात काहीच चुुकीचे नाही, तिथे जाऊन भरपूर शिका, अर्थार्जन करा, मात्र मातृभूमीची सेवा करण्यासाठी देशात परत या. आपला देश, मातृभाषा, जन्मस्थान यांचा विसर कधीही पडू देऊ नका. तुम्ही कितीही मोठ्या पदव्या घेतल्या, तरी देश आणि समाजाबाबतचे उत्तरदायित्व तुम्हाला नजरेआड करून चालणार नाही, असा सल्ला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या शानदार नवव्या पदवीदान समारंभात बोलताना दिला. 

आजच्या समारंभात दै.‘पुढारी’चे चेअरमन आणि मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ देऊन गौरवण्यात आले. पत्रकारिता आणि सामाजिक कार्यातील कामगिरीबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला. उपराष्ट्रपतींनी डॉ. जाधव यांचा गौरव करताना सामाजिक सुधारणांच्या प्रक्रियेतील त्यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे सांगून, ‘पुढारी’हे केवळ बातम्या देणारे वृत्तपत्र राहिले नसून, ते एक प्रकारची सामाजिक चळवळ झाली आहे, असे उद‍्गार काढले.

भारतीय संस्कृतीत विविधतेत एकता : व्यंकय्या नायडू

उपराष्ट्रपती नायडू यांनी आपल्या लिखित भाषणाबरोबरच काही महत्त्वाचे मुद्देही ऐनवेळी मांडले.भारतीय संस्कृतीचे महत्त्व स्पष्ट करताना ते म्हणाले, या जगामध्ये अनेक प्रकारच्या संस्कृती उदयास आल्या आणि त्या लयासही गेल्या; पण भारतीय संस्कृती मात्र कायम टिकून राहिली आहे. धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव आपल्या डीएनएमध्ये आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’, ‘सर्वे भवन्तु सुखिन, सर्वे सन्तु निरामया’ या तत्त्वांवर आपला विश्‍वास आहे. आपल्या देशात विविध धर्मांतील तसेच विविध भाषा बोलणारे लोक राहतात. परंतु, या विविधतेतच एकता असल्याचे दिसून येते. प्राचीन भारतामध्ये नालंदा विद्यापीठासारखी प्रगत शैक्षणिक केंद्रे अस्तित्वात होती. आपली संस्कृतही अतिशय संपन्‍न भाषा असल्याचे जगाने मान्य केले आहे.

स्त्रियांचा आदर करणारी संस्कृती 

या समारंभात विशेष नैपुण्य दाखवणार्‍या स्नातकांना सुवर्ण पदके देऊन गौरवण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थिनींची संख्या सर्वाधिक होती. त्याचा आवर्जून गौरवपूर्ण उल्लेख करताना उपराष्ट्रपती म्हणाले, विद्यार्थिनींनी इथे मोठी बाजी मारल्याचा मला आनंद वाटला. लोकसंख्येच्या 50 टक्के असलेल्या महिलांचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे. आपल्याकडे विद्येचे प्रतीक म्हणून सरस्वती, संरक्षणाचे प्रतीक म्हणून पार्वती, तर धनाचे प्रतीक म्हणून लक्ष्मीकडे पहिले जाते. तसेच नर्मदा, गोदावरी आदी नद्यांची नावेदेखील स्त्रियांच्या नावावरून दिलेली आहेत. कारण आपली संस्कृती स्त्रियांचा आदर करणारी आहे. परंतु, देशात घडलेले निर्भया प्रकरण हे आपल्यासमोरील एक आव्हान असल्याचे दिसून येत आहे.

उच्चशिक्षण देणार्‍या संस्थांनी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्‍ती, प्रामाणिकपणा,  सामाजिक जबाबदारीचे भान, शिस्त, सहवेदना, महिलांविषयी आदर, अनेकतावादाबाबत आग्रही असणे इत्यादी मूल्ये रुजवण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. 

मराठी भाषा सुंदर

तरुण पिढी गुगलला देव मानते; पण गुरुपेक्षा कोणीही श्रेष्ठ असू शकत नाही, हेदेखील त्यांनी बोलून दाखवले. ब्रिटिशांच्या वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडण्याची गरज बोलून दाखवताना ते म्हणाले, इंग्रजी जरूर शिकले पाहिजे, परंतु घरामध्ये मातृभाषेतच बोलले पाहिजे. घरामध्ये आपण मम्मी, डॅडी का म्हणतो...  त्याऐवजी आपण माँ किंवा आई का म्हणत नाही... आई-वडिलांचा आदर करणे हे महत्त्वाचे आहे. देशात महाराष्ट्र हे राज्य व मराठी भाषा खूप सुंदर असून मराठी भाषा आणखी सुंदर करण्याचा प्रयत्न आपण करावा.

तरुण लोकसंख्येने काहीही साध्य करणे शक्य : डॉ. जाधव

सत्काराला उत्तर देताना डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी, भारतातील तरुणांच्या सर्वाधिक लोकसंख्येमुळे काहीही साध्य करणे शक्य आहे, असा विश्‍वास व्यक्‍त केला. ते म्हणाले, देशाची तरुण लोकसंख्या ही त्या देशाची सर्वात मोठी शक्‍ती आणि संपत्ती असते. 2030 मध्ये भारत हा जगातील सर्वात तरुण देश ठरणार आहे. जगातल्या प्रत्येकी चार पदवीधरांपैकी एक विद्यार्थी म्हणजे भारतातील उच्च शिक्षण व्यवस्थेची निर्मिती असेल. देशातील 65 टक्के म्हणजेच 80 कोटी लोक हे 35 वर्षांखालील असतील. त्यामुळे आगामी काळात आपल्याला काहीही साध्य करणे सहज शक्य आहे.

प्रारंभी त्यांनी डॉक्टरेट प्रदान करून सन्मान केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्‍त केली. डॉ. डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक, शिक्षणतज्ज्ञ डॉ. डी. वाय. पाटील यांनी अभिमत विद्यापीठाच्या इतिहासात नवा मानदंड निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले. अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांना सर्वोत्तमाची आस आहे. ज्ञानाबरोबर सबलीकरण हे त्यांचे ध्येय आहे, अशा शब्दांत डॉ. जाधव यांनी त्यांचा गौरव केला.

साक्षरता वाढीला लागणे खरे आव्हान

पदवीप्राप्‍त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून ते म्हणाले, स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी आपल्या देशाचे साक्षरतेचे प्रमाण 12 टक्के होते. आता हेच प्रमाण 74 टक्के झालेले आहे. तरीही  सध्याच्या लोकसंख्येपैकी अंदाजे 43 कोटी 30 लाख लोक अद्यापही निरक्षर आहेत. विकसनशील राष्ट्रात वाढत्या लोकसंख्येबरोबरच साक्षरता वाढीस लागणे हेच खरे आव्हान असते. म्हणूनच, शिक्षणाच्या हक्‍काचा व्यापक विस्तार होण्याची, तो तळागाळापर्यंत पोहोचण्याची नितांत गरज आहे.

नव्या धोरणात शिक्षण क्षेत्राचे चित्र बदलेल

मनुष्यबळ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतातील केजी टू पीजी विद्यार्थ्यांची संख्या 27 कोटी आहे. आता लवकरच नवीन शैक्षणिक धोरण जाहीर होईल. या धोरणात देशभरातील शिक्षण क्षेत्राचे चित्र बदलेल, अशी आशा मला वाटते. गुणवत्तापूर्ण शिक्षण, प्रयोग आणि संशोधन या आपल्या बदलत्या प्रगतशील अपेक्षा नवे शिक्षण धोरण पूर्ण करेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

आपल्या देशाच्या एकूण दरडोई उत्पन्‍नापैकी सहा टक्के रक्‍कम ही शिक्षणावर खर्च व्हावी, अशी कोठारी आयोगाची शिफारस आहे. आपले शासन शिक्षण क्षेत्रावर जास्तीत जास्त खर्च करेल, अशी मला आशा वाटते. शिक्षणावरील गुंतवणूक ही भविष्यात  समृद्ध लाभांश देणार आहे, हे विसरून चालणार नाही, असे ते म्हणाले.

मी गेली 50 वर्षे पत्रकारितेत कार्यरत आहे, वृत्तपत्रांची भूमिका ही केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित नसून व्यापक जनसमूहाला शिक्षित करण्याचे आहे, असा माझा ठाम विश्‍वास आहे, असेही ते म्हणाले.

डॉ. जाधव यांच्याबरोबरच भुवनेश्‍वरच्या केआयआयटीचे आणि केआयएसएसचे संस्थापक प्रा. अच्युत समंथा आणि पारनेरच्या गुरुसेवा मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. विष्णू आर. पारनेरकर यांनाही ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. एन. राजदान यांनी विद्यापीठाच्या कामगिरीचा आढावा घेतला.  आजच्या समारंभात 1 हजार 56 स्नातकांना पदवी आणि पदविका तसेच 19 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके, 12 विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली. 

प्रारंभी गायिका बेला शेंडे आणि गायक स्वप्निल बांदोडकर यांनी विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. या सोहळ्यात विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि पदवीदान प्रक्रियेची धुरा सांभाळली. पालकमंत्री गिरीश बापट, डॉ. डी. वाय. पाटील, संस्थेचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. यशराज पाटील आदी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते; पण ऐनवेळी त्यांना अण्णा हजारे यांच्या उपोषणप्रश्‍नी दिल्लीला जावे लागल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत.

उपराष्ट्रपती नायडू

अनेक संस्कृतींचा अस्त, भारतीय संस्कृती कायम
भारतीय संस्कृती स्त्रियांचा आदर करणारी
तरुण पिढी गुगलला देव मानते, मात्र गुरुपेक्षा
कोणीही श्रेष्ठ असू शकत नाही

डॉ. प्रतापसिंह जाधव

तरुणांच्या सर्वाधिक लोकसंख्येने भारताला काहीही साध्य करणे सहज शक्य
देशातील साक्षरता वाढवणे खरे आव्हान
प्रगतशील अपेक्षा नवे शिक्षण धोरण पूर्ण करील

या सोहळ्यास बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

Tags : Dr Pratapsingh Jadhav, Pune, D Lit Honor, Dr D Y Patil University, Venkaiah Naidu 


  •