होमपेज › Pune › आता पुतळ्यावरून श्रेयवाद उफाळला

आता पुतळ्यावरून श्रेयवाद उफाळला

Published On: Jan 19 2018 1:56AM | Last Updated: Jan 18 2018 11:44PMपिंपरी ः नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी गावात  छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे; मात्र प्रस्तावित पुतळ्याचे क्ले मॉडेल तयार होताच पुतळ्याच्या श्रेयवादावरून भाजपा व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत श्रेयवादाची लढाई रंगली आहे. 

पालिका निवडणुकीत पिंपरी गावातून उषा वाघेरे, डब्बू आसवानी, निकिता कदम (राष्ट्रवादी) संदीप वाघेरे (भाजप) हे निवडून आले. यातील संदीप वाघेरे हे राष्ट्रवादीच्या कार्यकाळात सुरू झालेल्या कामांचे श्रेय घेत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे. 

भैरवनाथ मंदिर चौकात हा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. सातारा येथील शिल्पकार संजय कुंभार यांनी प्रस्तावित पुतळ्याचे क्ले मॉडेल तयार केले आहे. भाजपाचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी सातारा येथे जाऊन पुतळ्याची पाहणी केली आणि वादाची ठिणगी पडली. दुसर्‍याच दिवशी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे व नगरसेविका उषा वाघेरे यांचे चिरंजीव ऋषीकेश वाघेरे यांनीही सातारा  गाठत पुतळ्याची पाहणी केली.

ऋषीकेश वाघेरे यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचा प्रस्ताव 2014चा आहे. कायदेशीर सर्व बाबी पूर्ण करूनच कामाला मूर्त स्वरूप  देण्यात येत आहे. नगरसेविका उषा वाघेरे यांच्या माध्यमातून प्रकल्पाचे काम सुरू आहे; परंतु धनशक्तीवाल्या  स्वयंघोषित समाजसेवक जनशक्तीला खेळवत आहेत. स्वप्नात जादूचा दिवा हातात घेऊन, जग बदलण्याच्या गप्पा मारून समाजकारण होत नसते, हे कळण्याइतपत समज नसलेल्या स्वयंघोषित पुढार्‍यांना देव सद्बुद्धी देवो, असा टोला त्यांनी लगावला.

भाजपाचे नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या कार्यकर्त्यांनीही छत्रपतींपेक्षा स्वतःचे पिताश्री मोठे कसे, असा सवाल करत संजोग वाघेरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारुढ पुतळ्याचे क्ले मॉडेलचे काम अंतिम टप्प्यात आल्याच्या वृत्तानंतर अनेकांचा पोटशूळ उठला. अवघ्या दहा महिन्यांत या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आणले. पालिकेच्या अर्थसंकल्पात 2014-2015 या आर्थिक वर्षात पिंपरी वाघेरे, प्रभागातील शिवाजी महाराज व गावातील दिवंगत नेत्याच्या पुतळ्याजवळील परिसराचे सुशोभीकरणासाठी 50 लाखांची तरतूद  होती.

परंतु या दिवंगत नेत्याच्या वंशजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाकडे दुर्लक्ष केले.दिवंगत नेत्याच्या पुतळ्याचे व परिसर सुशोभीकरणाचे 47 लाख रुपयांचे काम 2016 मध्ये केले. संदीप वाघेरे 2017 च्या महापालिका निवडणुकीत विजयी झाले. त्यांनी पुतळ्यासाठी पाठपुरावा केला. त्याला अधिकार्‍यांनी प्रतिसाद दिला. मूर्तिकार संजय कुंभार यांच्यासोबत बैठकीनंतर पुतळ्याचे काम मार्गी लागले. संदीप वाघेरेंनी पूर्वजांना महत्त्व न देता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामास महत्त्व दिले, कर्तव्य पार पाडले यात गैर काय? कोणत्या पुतळ्याचे सुशोभीकरण अगोदर झाले हे जनतेला नक्की दिसले, असा चिमटा या कार्यकर्त्यांनी घेतला आहे.