Wed, Jul 24, 2019 02:03होमपेज › Pune › रायगड ते पंढरपूर छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळा 

रायगड ते पंढरपूर छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळा 

Published On: Jul 07 2018 1:36AM | Last Updated: Jul 06 2018 11:10PMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

राज्यातील सांगली, पिंपरी- चिंचवड, मुळशी, मुंबईतील तरुणांनी एकत्र येऊन गेल्या चार वर्षांपासून रायगड ते पंढरपूर छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळा सुरू केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पादुका डोक्यावर घेऊन हे धारकरी वारकर्‍यांसमवेत पंढरपूरची पायी वारी करतात. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात ज्याप्रमाणे उभे रिंगण, गोल रिंगण असते, त्या धर्तीवर या पालखी सोहळ्यात सादर होणारे व्यायाम रिंगण, शस्त्र रिंगण हा आकर्षणाचा विषय ठरत आहे.  एकूणच भक्‍ती आणि शक्‍ती याचा सुंदर मिलाफ असलेला हा पालखी सोहळा अनेकांच्या औत्सुक्याचा व कौतुकाचा विषय ठरला आहे.

सांगलीतील डॉ. संदीप महिंद यांच्या पुढाकाराने सन 2015 मध्ये रायगड ते पंढरपूर छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळा सुरू झाला. सांगलीतील गणेश माने हे आज या पालखी सोहळ्याची धुरा सांभाळत आहेत.  त्यांच्या समवेत संतोष गोलांडे, केतन केमसे, शैलेश गुरव यांचा पुढाकार आहे.दरवर्षी चतुर्थीला छत्रपती शिवाजी महाराज यांची ही पालखी रायगडावरून प्रस्थान ठेवत. पुढे पाचाडमार्गे निजामपूर - ताम्हिणी घाट - मुळशी - पौड - भूगाव मार्गे पुणे शहरापर्यंत येते. पुढे ही पालखी संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याबरोबरच पंढरपूरकडे मार्गस्थ होते.  साधारण 100 तरुण या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. गावोगावी पालखीचे स्वागत केले जाते.

रोज साधारण 20 ते 30 कि.मी. पायी प्रवास होतो. संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या समवेत प्रवास होत असला तरी शिवचरित्र व्याख्यानासारख्या उपक्रमासाठी बाहेर प्रवास करून वाढीव प्रवास होतो. व्यायाम रिंगण व शस्त्र रिंगण हे या पालखी सोहळ्याचे आकर्षण असते.पुण्यातील पेरू गेट, भावे स्कूल येथे व्यायाम रिंगणात व्यायामाचे जोर, बैठका आदी प्रकार सादर केले जातात, तर शस्त्र रिंगणात तलवार, ढाल, भालाफेक याची प्रात्यक्षिके सादर केली जातात. पालखी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पादुका घेऊन पंढरपूरला पोचते. पांडुरंगाचे दर्शन घेतल्यावर पंढरपूरहून परतीचा प्रवास मात्र वाहनांतून केला जातो. विटा, सांगली, सातारा मार्गे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपाशी वारीची सांगता होते. भक्‍ती आणि शक्‍ती याचा सुंदर मिलाफ असलेला हा छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळा अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.

उद्या व्यायाम व शस्त्र रिंगण

छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळ्यात यावर्षी दि. 8 जुलै रोजी दुपारी बारा वाजता सावरकर स्मारक पुणे येथून महानगर शोभायात्रा सुरू होऊन पेरू गेट, भावे स्कूलपर्यंत जाणार आहे. तेथेच व्यायाम रिंगण व दुपारी 3 वाजता शस्त्र रिंगण होणार असल्याची माहिती संतोष गोलांडे यांनी दिली.