Wed, Apr 24, 2019 21:45होमपेज › Pune › परदेशी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या नावे धनादेश

परदेशी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या नावे धनादेश

Published On: Mar 11 2018 1:02AM | Last Updated: Mar 11 2018 12:05AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या मागासर्गीय कल्याणकारी योजनेअंतर्गत परदेशात उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या नावाने धनादेश किंवा ‘ईसीएस’द्वारे लाभ देण्यात येणार आहे. पूर्वी धनादेश संबंधित विद्यापीठाच्या नावाने काढले जात होते, आता ही पद्धत बंद करण्यात येणार आहे. 

सदर निर्णयास मान्यता देण्याचा प्रस्ताव 20 मार्चच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला आहे. नागरवस्ती विकास योजना विभागातर्फे विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. मागासवर्गीय युवकांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी पालिकेकडून दीड लाख रुपयांचे अर्थसाह्य केले जाते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, आर्थिक अडचणीमुळे परदेशातील उच्च शिक्षणासाठी निवड होऊनही त्यापासून वंचित राहू नये, यामुळे ही योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यास किमान एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी दीड लाख रुपये एकदाच विद्यापीठाच्या नावाने  दिले जात होते. त्यात बदल करून ती रक्कम धनादेश किंवा ईसीएसद्वारे थेट विद्यार्थ्याच्या नावे अदा केली जाणार आहे. या प्रशासनाच्या प्रस्तावास मान्यता देण्याचा विषय सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी शहराचा रहिवासी असावा. अर्जासोबत परदेशातील उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याचे पत्र, विद्यार्थी किंवा वडिलांचा जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट, आधारकार्ड, अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर बोनाफाईड प्रमाणपत्र, बँक पासबुक आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.