Fri, Apr 26, 2019 09:39होमपेज › Pune › ‘निपाह’बाबत डुकरांच्या रक्‍तजल नमुन्यांची तपासणी करा

‘निपाह’बाबत डुकरांच्या रक्‍तजल नमुन्यांची तपासणी करा

Published On: Jun 05 2018 1:28AM | Last Updated: Jun 05 2018 12:23AMपुणे : प्रतिनिधी

केरळमध्ये प्रसार झालेला निपाह व्हायरस हा डुक्‍कर आणि वटवाघळांद्वारे माणसांमध्येे पसरतो. तो महाराष्ट्रातील डुकरांमध्ये आहे का याची तपासणी करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने पावले उचलली असून प्रत्येक जिल्ह्यातील 50 डुकरांचे ‘सीरम’ अर्थात ‘रक्‍तजल’ नमुने गोळा करण्याचे आदेश पशुसंवर्धन विभागाने सर्व जिल्ह्यांना दिले आहेत. हे नमुने भोपाळ येथील प्राण्यांच्या रोगनिदान प्रयोगशाळेत ‘निपाह विषाणू’ आहे का, याचे निदान करण्यासाठी पाठविण्यात येणार आहेत.

केरळमध्ये कोझिकोड जिल्ह्यात निपाह व्हायरसचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंत तेथे 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचा प्रसार हा प्रामुख्याने फळे खाणारी वटवाघुळे आणि डुकरांद्वारे होतो. निपाह व्हायरस केरळमधून इतर राज्यांमध्येही पसरण्याची भीती आहे. याबाबत उपाययोजना करण्यासाठी गेल्या शनिवारी राज्याचे आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे यांनी पुण्यात राज्यातील आरोग्य विभाग व पशुसंवर्धन विभागातील अधिकार्‍यांची संयुक्‍त बैठक घेतली. यामध्ये डुकरांच्या ‘सीरम’ची तपासणी करण्यात यावी, असा निर्णय झाला. 

यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील 50 डुकरांचे रक्‍तजल नमुने घेण्यात येणार आहेत. हे नमुने भोपाळ येथील ‘हाय सेक्युरिटी अ‍ॅनिमल डिसिज लॅबोरेटरी’ येथे निपाह व्हायरसच्या तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. यानुसार प्रत्येक तालुक्याला ‘शीघ्र कृतिदल पथक’ स्थापन करण्यात आले आहे. येत्या आठवड्यात हे संपूर्ण नमुने जमा होतील आणि ते भोपाळ येथे तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपआयुक्‍त डॉ. प्रशांत भड यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली.

माणसाच्या रक्‍तनमुन्यांत निपाह व्हायरस आहे की नाही याची तपासणी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेत केली जाते. तर प्राण्यांच्या रक्‍तनमुन्यांमधील निदान करण्यासाठी त्यांचे नमुने हे भोपाळ येथील प्राण्यांच्या रोगनिदान प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. पशुसंवर्धन विभागाकडून गोळा करण्यात येणारे रक्‍तनमुने संशयित किंवा आजारी नव्हे तर आसपास फिरणार्‍या डुकरांचे घेण्यात येत आहेत. एका आठवड्यानंतर त्यांचा अहवाल प्राप्त होणार आहे.

निपाह रुग्णांसाठी बेड तयार ठेवा

’निपाह व्हायरस’चा रुग्ण पुण्यात आढळला तर त्याच्यावर उपचार करण्यासाठी महापालिकेच्या नायडू रुग्णालय आणि ससून रुग्णालयात स्वतंत्र बेड तयार ठेवा, अशा सूचना आरोग्य संचालक  डॉ. संजीव कांबळे यांनी दिल्या.  निपाह व्हायरसबाबत काय काळजी घ्यावी यासाठी पुण्यातील विश्रांतवाडी येथील आरोग्य भवन इमारतीमध्ये राज्याचे आरोग्य संचालकांनी बैठक घेतली. यावेळी पुण्यातील राज्य साथरोग नियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंखे, साथरोग विभागाचे सहसंचालक डॉ. मुकुंद डिग्गीकर, एनआयव्हीचे तज्ज्ञ, ससून, महापालिका येथील डॉक्टर व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ससून आणि महापालिकेच्या रुग्णालयांत निपाह व्हायरसच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात यावी.

निपाहबाबतची शास्त्रीय माहिती राज्यातील सर्व आरोग्य संस्था आणि प्रत्येक वैद्यकीय अधिकार्‍यापर्यंत पोहोचायला   हवी, अशा सूचना आरोग्य संचालकांनी या बैठकीत दिल्या.  निपाह व्हायरस हा बाधित प्राणी किंवा रुग्णाच्या जवळून संपर्कात आल्यावरच त्याचा प्रसार होतो. तर स्वाइन फ्लूसारखा हवेद्वारे पसरत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात तरी या विषाणूचा फारसा धोका नसल्याचे यावेळी वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले.