Thu, Apr 25, 2019 04:14होमपेज › Pune › कमिशनवर नोटा देण्याच्या आमिषाने गंडा

कमिशनवर नोटा देण्याच्या आमिषाने गंडा

Published On: Apr 29 2018 2:41AM | Last Updated: Apr 29 2018 2:41AMपुणे ः प्रतिनिधी

पाचशे व दोन हजार रुपयांच्या नोटा दिल्यानंतर शंभराच्या नोटांसोबतच त्यावर 20 टक्के कमिशन मिळेल, असे सांगून दोघांनी साडेपाच लाख रुपये पळविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोंढवा परिसरात ही घटना घडली असून, याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नोटाबंदीला दीड वर्ष झाल्यानंतरही नोटा बदलीचा लपंडाव सुरूच असल्याचे यावरून दिसत आहे. 
याप्रकरणी रवींद्र गुप्ता (वय 41, रा. वैदूवाडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आशपाक अन्सारी आणि गफार शेख या दोघांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र गुप्ता हे व्यावसायिक आहेत. गफार शेख याने आशपाक अन्सारी याच्यासोबत फिर्यादींची ओळख करून दिली होती. त्यावेळी अन्सारी यांने त्याच्या ओळखीतील एक शहा नावाची व्यक्ती असून, त्याच्याकडे शंभराच्या खूप नोटा असल्याचे सांगितले. तसेच, त्याला पाचशे आणि दोन हजाराच्या नोटा दिल्यानंतर तो आपल्याला शंभराच्या नोटा देईल. तसेच, त्यासाठी 20 टक्के कमिशनही मिळेल असे फिर्यादींना सांगण्यात आले. कमिशनपोटी 20 टक्के मिळणार्‍या पैशांमधील 10 टक्के फिर्यादींना व 10 टक्के आशपाक अन्सारी असे वाटून घेण्याचे ठरले.  

त्यानुसार, फिर्यादींनी 50 हजार आणि त्यांच्या एका मित्राने साडे सहा लाख असे एकूण 7 लाख रुपये जमवून आशपाक अन्सारी याला दिले. त्यावेळी त्यांने कमिशनचे म्हणून फिर्यादींना प्रथम 1 लाख 60 हजार रुपये दिले. त्यानंतर तो इतर पैसे घेऊन येतो, असे म्हणून पैसे घेऊन पसार झाला. त्यानंतर परत आला नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. 

दरम्यान एका हातात पाचशे- हजाराच्या नोटा आणि दुसर्‍या हातात शंभराच्या नोटा असा व्यवहार ठरला होता. याप्रकरणी गफार शेख याला अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली आहे. आशपाक अन्सारी पसार असून, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक वाडकर हे करत आहेत.