Tue, Nov 13, 2018 10:23होमपेज › Pune › एटीएमच्या पासवर्डचा गैरवापर करून १ कोटी ३५ लाखांचा अपहार

एटीएमच्या पासवर्डचा गैरवापर करून १ कोटी ३५ लाखांचा अपहार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

शहरातील 17  एटीएमच्या गोपनीय पासवर्डचा गैरवापर करून 1 कोटी 35 लाख 34 हजारांचा अपहार केल्याप्रकरणी सेक्युरीट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कस्टोडियन पदावर काम करणार्‍या दोघांना खडकी पोलिसांनी अटक केली आहे.  

या प्रकरणी राजेशकुमार पिल्ले (वय 39, रा. कशेली, जि. ठाणे) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अभिजित संजय गोसावी (वय 21, रा. मु. पो. लाखेवाडी, ता. इंदापूर) आणि अविनाश अशोक कांबळे (वय 34, रा. डीएव्ही शाळेजवळ, औंध, डी. पी. रस्ता) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांच्या माहितीनुसार, सेक्युरीट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या औंध शाखेत अभिजित गोसावी व अविनाश कांबळे हे दोघे कस्टोडियन या पदावर काम करीत होते. त्यांच्याकडे औंध परिसरातील पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय बँक, सेंट्रल बँक, टाटा डब्ल्यूएलए आणि मनीस्पॉट यांना सेवा देण्याचे काम होते. त्यांच्याकडे 21 एटीएमचे काम होते.

परंतु, 2 सप्टेंबर ते 21 नोव्हेंबरदरम्यान या दोघांनी त्यांचा साथीदार शिनू राजकुमार सिंधू सालादल्लू (रा. पिंपळे गुरव) याच्यासह मिळून या गोपनीय पासवर्डचा गैरवापर करून 21 एटीएमपैकी 17 एटीएममधून सुमारे एक कोटी 35 लाख 34 हजार 700 रुपये काढले. या गुन्ह्यामध्ये शिनूने मदत केली. फिर्यादी पिल्ले हे सेक्युरीट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत दिल्ली कार्यालयात एटीएम ऑपरेशन्स पदावर काम करतात. फिर्यादी यांच्या कंपनीतील लेखापरीक्षकांनी केलेल्या ऑडिटमध्ये हा आर्थिक अपहार उघडकीस आला. पुढील तपास खडकी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजित लकडे करीत आहेत.