होमपेज › Pune › ऐन उन्हाळ्यात भाज्या झाल्या स्वस्त

ऐन उन्हाळ्यात भाज्या झाल्या स्वस्त

Published On: May 28 2018 1:38AM | Last Updated: May 27 2018 8:37PMसांगली : प्रतिनिधी

ऐन उन्हाळ्यात काही अपवाद वगळता बहुतेक फळभाज्या  आणि पालेभाज्या स्वस्त आहेत. आवक वाढल्याने दर घसरले आहेत. त्यामुळे ग्राहकांना फायदा होत असला तरी शेतकर्‍यांना मात्र फटका बसत आहे. प्रत्येक वर्षी  उन्हाळ्यात भाज्याची आवक कमी होते. परिणामी दरात मोठी वाढ  होते. यावर्षी मार्च आणि   एप्रिलच्या  पहिल्या आठवड्यात   काहीप्रमाणात भाज्यांच्या दरात वाढही झाली. मात्र पुन्हा आवक वाढल्याने   दर खाली आले.  उन्हाळ्यात पाणी  टंचाई असते. त्यामुळे आवक  कमी  होऊन चांगला दर मिळतो हे  लक्षात घेऊन अनेक शेतकरी भाजीपाल्याची  लागवड करतात. त्या प्रमाणे अनेकवेळा भाज्यांना दरही चांगला  मिळतो. मात्र यंदा जिल्ह्याच्या पूर्वभागात टेंभू, आरफळ, म्हैसाळ, ताकारी पाणी योजनांचे पाणी आले आहे. त्यामुळे बागायती क्षेत्र वाढले आहे. अनेक शेतकरी आंतरपीक म्हणून भाजीपाल्याचे पीक करीत आहेत. 

त्यामुळे यंदा ऐन उन्हाळ्यातही भाजीपाल्याची आवक वाढलेली आहे. विशेषत: कोबी,  फ्लॉवर, वांगी, टोमॅटो, दोडका, गवारी, भेंडी आदी भाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे या भाज्याचे दर कमी झाले आहेत. दर कमी झाल्याने ग्राहकांना फायदा होत आहे. मात्र शेतकर्‍यांना कमी दराचा फटका बसत आहे. उन्हाळ्यात तापमान वाढल्याने एकरी उत्पादनात घट होते. आता दरही कमी झाल्याने आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. यामध्ये व्यापार्‍यांनाच अधिक फायदा होत आहे. गवारी 40 रुपये किलो झाल्याने त्याचा तोडण्याचाही खर्च परवडत नसल्याचे शेतकर्‍यांचे मत आहे.  दरम्यान, मेथी, कोथिंबीरीची आवक कमी असल्याने दर थोडे जास्त आहेत.  मात्र पालक, करडई  या पालेभाज्या प्रति पेंडी  पाच ते दहा रुपयास मिळत आहे. 

फळभाज्यामध्ये   वांगी, दोडका, कारले, भेंडी, मिरची, गाजर, वरणा अशा भाज्यांचा दर प्रति किलोस 30 ते 40 रुपये आहे.  कोबी, फ्लॉवर गड्डयाचे दर ग्राहकांच्या आवाक्यात आहेत. प्रति गड्डा पाच ते वीस रुपयांना  मिळतो आहे. दुधी भोपळा प्रति नग 10   रुपये तर मुळा, बीट प्रती नग 5 रुपये आहे.  गाजरांचा प्रती किलोचा दर 20 ते 40 रुपये आहे. वाढत्या तापमानामुळे काकडी, लिंबू यांना मोठी मागणी आहे. त्यामुळे यांच्या दरात वाढ झालेली आहे. देशी काकडी 30 ते 40 रुपये किलो तर संकरीत काकडी 40 रुपये किलो आहे. प्रती लिंबूचा दर 1 ते 3 रुपये आहे.  उकाड्यामुळे कलिंगडांनाही चांगली मागणी आहे. त्याप्रमाणे आवक मोठ्या प्रमाणात आहे. कलिंगडे प्रति नग 20 ते 60  रुपये आहे.  सफरचंद 100 ते 150,   चिकू 30 ते 40 रुपये प्रती किलो  आणि अननस 40 ते 60 रुपये प्रति नग आहे.