Wed, Jan 22, 2020 21:48होमपेज › Pune › गप्पिष्ट अधिकारी अखेर ‘जागेवर’

गप्पिष्ट अधिकारी अखेर ‘जागेवर’

Published On: Aug 23 2019 1:33AM | Last Updated: Aug 23 2019 1:33AM
पिंपरी : प्रतिनिधी

महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असताना पालिकेचे बहुतांश अधिकारी सभागृहाच्या बाहेरच्या बाजूला गप्पा मारण्यात व्यस्त होते. त्यामुळे सभागृहात अधिकार्‍यांची संख्या केवळ आठपर्यंत होती. त्यावर नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला. त्याची दखल घेऊन महापौर राहुल जाधव यांनी अधिकार्‍यांना सभागृहात उपस्थित राहण्यास आदेश दिलेत. त्यानंतर काही मिनिटांत अधिकारी सभागृहात येऊन स्थानापन्न झाले. त्या वेळी नगरसेवकांनी बाके वाजवीत अधिकार्‍यांचे औपरोधिकपणे स्वागत केले.

हा धक्कादायक प्रकार पालिकेच्या बुधवारी (दि.21) झालेल्या सर्वसाधारण सभेत घडला.  अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. पालिका सभागृहात नेहमीप्रमाणे अधिकारी मोठ्या संख्येने गैरहजर होते.  तासभर चर्चा झाल्यानंतरही अधिकारी सभागृहात येत नसल्याने भाजपचे नगरसेवक बाबू नायर यांनी सभागृहात केवळ 8 अधिकारी उपस्थित असल्याची बाब महापौरांच्या निदर्शनास आणून दिली. सर्व अधिकारी मागील दालनात गप्पा मारत बसलेले आहेत. आयुक्तांचा अधिकार्‍यांवर वचक नसल्याने ते सभागृहात उपस्थित नाहीत, असा आरोप त्यांनी केला. जोपर्यंत सर्व जबाबदार अधिकारी सभागृहात येत नाहीत, तोपर्यंत सभेचे कामकाज सुरू करू  नये, अशी मागणी त्यांनी केली. महापौरांनी तत्काळ सर्व अधिकार्‍यांना सभागृहात हजर होण्याचे आदेश दिले. त्यानुसार काही मिनिटांत अधिकार्‍यांचा लोंढा सभागृहात जमा झाला. अधिकार्‍यांची आसने फुल्ल झाली. अधिकारी येताच नगरसेवकांनी बाके वाजवून त्याचे औपरोधिकपणे स्वागत केले. 

नगरसेवक विकास डोळस म्हणाले, महापौरांच्या आसनामागील बाजूस अधिकार्‍यांचा ‘कॉलेज कट्टा’ जमा होतो. आयुक्तांचा अधिकार्‍यांवर वचक नसल्याने असे प्रकार घडत आहेत. बेशिस्त अधिकार्‍यांना सभागृहाचा आदर ठेवण्यास सांगा, असा सल्ला त्यांनी दिला.