Sat, Jul 20, 2019 22:01होमपेज › Pune › रुग्णालयांच्या नावापुढे लागणार ‘धर्मादाय’ 

रुग्णालयांच्या नावापुढे लागणार ‘धर्मादाय’ 

Published On: Sep 05 2018 8:18PM | Last Updated: Sep 05 2018 8:18PM पुणे : प्रतिनिधी

मुळात धर्मादाय रुग्णालये असली तरी कार्पोरेट बनलेल्या पंचतारांकित रुग्णालयांकडे पाहून गरीब रुग्ण त्यामध्ये पाउल टाकण्याचे धाडस करत नाही. कारण टोलेजंग इमारती आणि बाहेरून चकाकणारे रुग्णालय ‘धर्मादाय’ असेलच त्यावर त्याचा विश्‍वास बसत नाही. त्यामुळे अनेक रुग्ण सवलतीच्या दरांतील तसेच मोफत उपचारांच्या योजनेपासून वंचित राहतात. असे होउ नये म्हणून आता या धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे ‘धर्मादाय’ हा शब्द लावणे बंधनकारक करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत. यामुळे पुण्यातील 56 धर्मादाय रुग्णालयांना आता ‘धर्मादाय’ हा शब्द त्यांच्या नावापुढे लावावा लागणार आहे. 

शहरात रूबी, जेहांगिर, पुना, संचेती, सहयाद्री (डेक्कन), दीनानाथ, थेरगावचे आदित्य बिर्ला या बडया रुग्णालयांसह इतर 56 छोटी - मोठी रुग्णालये धर्मादायच्या आखत्यारित आहेत. त्यांच्यावर धर्मादाय कार्यालयाचे नियंत्रण आहे. पण या सर्व रुग्णालयांच्या नावाच्या पाटीमध्ये कोठेही ‘धर्मादाय’ असा उल्लेख नाही. त्यामुळे  हे रुग्णालय धर्मादाय आहे की खासगी ही बाब सर्वसामान्य रुग्णांच्या लक्षात येत नाही. म्हणून, त्यांना येथे उपचार मिळेल की नाही याबाबत साशंकता असते. असे होउ नये म्हणून या नावाचा समावेश करावा असे आदेश पुणे हॉस्पिटल असोसिएशनला देण्यात आले आहेत. त्यापैकी न-हे येथील नवले रुग्णालयाने त्याची अंमलबजावणी केली असल्याची माहिती धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप यांनी दिली. 

 राज्यातील सर्व रुग्णालयांना आदेश

हा निर्णय केवळ पुण्यापुरताच लागू नसून तो महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णलयांसाठी लागू आहे. राज्यात एकुण 430 धर्मादाय रुग्णालये असून त्याअंतर्गत दहा टक्के म्हणजे पाच हजार खाटा या आर्थिक दुर्बल  (वार्षिक उत्पन्न 1.80 लाखाच्या आतील)  तर आणखी दहा टक्के म्हणजे पाच हजार खाटा या निर्धन  (वार्षिक उत्पन्न 85 हजाराच्या आतील) रुग्णांसाठी राखीव आहेत. आर्थिक दुर्बल रुग्णांना उपचारांमध्ये 50 टक्के सवलत तर निर्धन रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार मिळण्याची तरतुद उच्च न्यायालयाने 2003 मध्ये एका निकालाद्वारे केली आहे.
  
‘राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे ‘धर्मादाय’ हा शब्द लावण्याचे निर्देश बैठकीत दिले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना ते रुग्णालय धर्मादाय आहे की नाही याची माहिती होईल. वरून कार्पोेरेट वाटणा-या धर्मादाय रुग्णालयांत गरीब रुग्णांना उपचार घेता येईल. 
 - शिवकुमार डिगे, आयुक्त, राज्य धर्मादाय विभाग

कोट
‘रुग्णालयांच्या नावापुढे ‘धर्मादाय’ हा शब्द लावण्यात यावा असे बुधवारी पुण्यातील धर्मादाय कार्यालयात झालेल्या बैठकीत सांगण्यात आले आहे. त्यानुसार पुण्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांच्या नावापुढे लवकरच हा शब्द समाविष्ट केला जाणार असून  संघटनेच्या वतीने तसे आश्‍वासन देण्यात आले आहे.
  - डॉ. गोपाळ फडके, अध्यक्ष, हॉस्पिटल असोसिएशन, पुणे