Sat, Aug 17, 2019 17:00होमपेज › Pune › धर्मादाय रुग्णालये विसरली ‘रुग्ण धर्म’

धर्मादाय रुग्णालये विसरली ‘रुग्ण धर्म’

Published On: Dec 19 2017 1:16AM | Last Updated: Dec 19 2017 12:03AM

बुकमार्क करा

पुणे : ज्ञानेश्‍वर भोंडे

धर्मादाय रुग्णालये काढणे आणि त्याद्वारे नफा कमावणे हा नवीन काळातील पैसे कमावण्याचा व्यवसाय बनलेला आहे. कारण रुपयाचीही गुंतवणूक न करता हजारो करोड रुपये किमतीच्या शासनाच्या जमिनी वर्षाकाठी एक रुपया अशा नाममात्र भाड्याने मिळतात. इतकेच नव्हे तर रुग्णालयाची इमारत, वैद्यकीय साधने मिळालेल्या देणग्यांनी त्यांच्या जिवावर पंचतारांकित रुग्णालये उभारणे आणि त्याद्वारे पैसे कमावणे, असे वर्णन सध्याच्या धर्मादाय रुग्णालयांचे करता येईल.

खासगी रुग्णालये उभी करण्यासाठी जमीन घेणे, इमारत बांधणे, वैद्यकीय साधने घेणे व डॉक्टर आणि इतर स्टाफ ठेवणे यासाठी काही करोडो रुपये खर्च होतात. हा प्रकार उद्योगपती किंवा एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट ग्रुपच्या रुग्णालयांनाच परवडतो; पण तेच रुग्णालय जर एखादी संस्था (ट्रस्ट) स्थापन केली आणि त्याद्वारे सुरू केले तर स्टाफ  आणि मेंटेनन्सचा खर्च वगळता सर्व काही मोफत मिळते. म्हणून शहरातील कॉर्पोरेट रुग्णालयांपैकी 90 टक्के कॉर्पोरेट रुग्णालये ही धर्मादाय आहेत; तर उरलेली 10 टक्केच केवळ खासगी असल्याचे दिसून येत आहे.

खरे पाहता कोणत्याही धर्मादाय संस्था स्थापन करण्याचा उद्देश वंचितांची सेवा करणे हा असतो. त्याचप्रमाणे धर्मादाय रुग्णालयांचा उद्देश नफा कमविणे नसून गरीब रुग्णांची सेवा करणे हा आहे; पण सध्याची रुग्णालये मात्र याच्या उलट करताना दिसतात. कोणत्यातरी सेलिब्रेटीच्या नावाने सेवाधर्मी संस्था काढणे, त्याद्वारे धर्मादाय रुग्णालय काढणे आणि प्रचंड नफा कमावणे हा प्रघात पडलेला आहे. सात ते आठ वर्षांपूर्वी शहरात उदयास आलेल्या एका धर्मादाय रुग्णालयाला एक एकराची बाजारभावाने 400 कोटींची जमीन वर्षाला नाममात्र एक रुपया दराने देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इमारत आणि त्यातील साधने हे सर्व देणगीतून मिळालेली आहेत. अशी अनेक उदाहरणे आहेत.

काय आहेत धर्मादाय रुग्णालये?

साधारणपणे खासगी रुग्णालयांची नोेंदणी ही ‘बॉम्बे नर्सिंग होम अ‍ॅक्ट’नुसार होत असते. पण धर्मादाय रुग्णालयांना हा कायदा लागू न होता त्यांचे नियंत्रण हे धर्मादाय कार्यालयाचे असते. या रुग्णालयांच्या नामधारी संस्थेच्या, ट्रस्टच्या मार्फत त्यांची नोंद होते आणि रुग्णालयाचे कामकाज पाहण्यासाठी विश्‍वस्तांची नेमणूक केली जाते. त्यांनी ठराविक कालावधीत धर्मादाय कार्यालयाला खर्चाचा हिशेब व बदल अर्ज दाखल करणे आवशक असते.