Tue, Jul 23, 2019 01:56होमपेज › Pune › कर्जमाफी अटी बदलाने प्रोत्साहनपर लाभाचे शेतकरी वाढणार

कर्जमाफी अटी बदलाने प्रोत्साहनपर लाभाचे शेतकरी वाढणार

Published On: Dec 09 2017 1:45AM | Last Updated: Dec 08 2017 11:44PM

बुकमार्क करा

पुणे ः प्रतिनिधी

राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकर्‍यांना द्यावयाच्या कर्जमाफी योजनेतील अटींमध्ये काही बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामध्ये योजनेंतर्गत 31 जुलै 2017 पर्यंतच्या थकबाकीदारांचाही कर्जमाफी योजनेस नव्याने समावेश करण्यात आल्याने नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांच्या प्रोत्साहन लाभाच्या शेतकर्‍यांची संख्या वाढणार आहे.

शेतकर्‍यांचे कर्जमाफीसाठी झालेल्या आंदोलनानंतर जून महिन्यात शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला. शेतकर्‍यांची थकित पीक कर्जाचे रुपये दीड लाखांपर्यंतच्या रकमेचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर लाभ म्हणून पंचवीस टक्के रक्कम देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मुद्दल व व्याजासह रुपये दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकर्‍यांंसाठी एकवेळ समझोता योजना (वन टाईम सेटलमेंट) ही 30 जून 2016 रोजी जाहीर करण्यात आली.

त्या अन्वये थकीत झालेल्या रक्कमेतून परतफेड केेलेली रक्कम वगळून 31 जुलै 2017 पर्यंत मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेली थकबाकीची रुपये दीड लाखापर्यंतची रक्कम कर्जमाफीस पात्र करण्यात यावी. या योजनेतंर्गत पात्र शेतकर्‍यांनी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण रक्कम दिनांक 31 मार्च 2018 पर्यंत बँकेंत जमा केल्यावर शासनातर्फे रुपये दीड लाख लाभाची रक्कम शेतकर्‍यांना अदा करण्यात यावी, अशी सुधारित तरतूद योजनेत समाविष्ट करण्यात आली आहे.

आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये घेतलेल्या पीक आणि मध्यम मुदत कर्जाची परतफेडीची दिनांक 30 जून 2016 नंतर येत असल्याने तसेच 2016-17 या आर्थिक वर्षात घेतलेल्या पीक व मध्यम मुदत कर्जाची परतफेड दिनांक 31 जुलै 2017 नंतर येत असल्याने केवळ तांत्रिक कारणास्तव पात्र शेतकरी देय लाभापासून वंचित राहू नये, यासाठी शेतकर्‍यांना या योजनेत अंर्तभूत करण्यासाठी आणि एका कुंटूंबास मिळणार्‍या कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभाच्या रकमा स्पष्ट करण्यासाठी पूर्वलक्षी प्रभावाने देण्यासाठी नवीन बदल करण्यात आल्याचेही शासन निर्णयात नमूद केले आहे.