Tue, Apr 23, 2019 22:01होमपेज › Pune › देहूतील वाहतूक मार्गांत बदल  

देहूतील वाहतूक मार्गांत बदल  

Published On: Jul 04 2018 2:18AM | Last Updated: Jul 04 2018 12:46AMदेहूरोड : वार्ताहर

आषाढीवारीसाठी देहूतून श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 5 जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्‍वभूमीवर गर्दी आणि वाहतूक कोंडीचा त्रास टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आदेश नुकतेच जिल्हाधिकार्‍यांनी दिले असून, वाहतूक विभाग आणि ग्रामीण पोलिसांकडून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

बुधवार (दि. 4) रोजी मध्यरात्री बारापासून देहूत हे आदेश लागू होतील.  यात्रेनिमित्त येणार्‍या भाविकांची वाहने यंदा देहूपासून बाहेर थांबविण्यात येणार आहेत. त्यासाठी पोलिसांच्या वाहतूक विभागाने तात्पुरते वाहनतळ उभारले आहेत. देहूरोड बाजूने येणार्‍या वाहनांसाठी ‘सीओडी’ डेपोच्या मागील बाजूस (लक्ष्मीनगर)   तर तळवडे मार्गे येणार्‍या वाहनांसाठी विठ्ठलवाडीजवळ खंडेलवाल चौकात मलनिःसारण केंद्रालगतच्या जागेत वाहनतळ उभारला आहे. पीएमपीएमएल आणि राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) बसगाड्यांसाठी गावाबाहेरच थांबे  आहेत. देहूरोड बाजूने येणार्‍या बसगाड्या राधाकृष्ण मंगल कार्यालयापर्यंत धावतील. 

वाहतुकीतील बदल :  

दि. 4  जुलै  रोजी रात्री 8.00 पासून देहूकडे जाणार्‍या रस्त्यावर बंदी. (दिंड्यांच्या वाहनांना सूट)

दि. 5  जुलै  रात्री 12.00 पासून मुंबई-पुणे महामार्गावर सेंट्रल चौक देहूरोड ते भक्ती-शक्ती चौक निगडीदरम्यान वाहतुकीस बंदी. या मार्गाने ये-जा करणार्‍या वाहनांसाठी कात्रज बाह्यवळण मार्गाची पर्यायी व्यवस्था.

दि. 5 जुलैपासून आळंदी बाजूने देहूकडे येणारी अवजड वाहतूक तळवडेमार्गे निगडीकडे वळविण्यात येईल.

दि. 6 जुलै रोजी स्थानिक नागरिकांनीही महामार्गाऐवजी कात्रज बाह्यवळण मार्गाचा अवलंब करावा.