Tue, Jul 16, 2019 21:53होमपेज › Pune › बदलणार्‍या अभ्यासक्रमाबाबत शकुंतला काळेंना विश्‍वास

विद्यार्थी गुणार्थी नव्हे तर गुणवान होतील

Published On: Jun 16 2018 1:31AM | Last Updated: Jun 16 2018 1:24AMपुणे : प्रतिनिधी 

विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारा अभ्यासक्रम हा कालसुसंगत असणे गरजेचे आहे. त्यामुळे दहावीच्या अभ्यासक्रमात आणि परीक्षा पद्धतीत होणारे बदल, हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून करण्यात आले आहेत. कृतिशील, सर्जनशील, वैचारिक, उपयोजित ज्ञानावर आधारलेला हा अभ्यासक्रम आहे. आकलन आणि उपयोजन पद्धतीला यात अधिक महत्त्व देण्यात आले असून, त्यातून विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती विकसित होईल. नव्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी गुणार्थी नव्हे तर गुणवान होणार आहेत, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

त्या म्हणाल्या, तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेली माहिती विद्यार्थी विविध मार्गाने घेत असतात. अशावेळी त्यांना माहिती आणि पाठ्यपुस्तकांच्या पलीकडचे ज्ञान देण्याची गरज आहे. त्यातून आकलन आणि उपयोजन होईल आणि मिळणार्‍या कौशल्याचा लाभ त्यांना भविष्यात होईल, यावर नव्या अभ्यासक्रमात भर देण्यात आला आहे. आता मूल्यमापनाची पद्धत बदलली असून, कृतिपत्रिका आल्या आहेत. त्यामुळे आकलन आणि उपयोजन शक्ती वाढेल. येणारा अभ्यासक्रम स्वानुभव, स्वविचार, स्वकल्पना आणि स्वकृती या चतुःसूत्रीवर आधारित आहे. हा बदल कालसुसंगत असून, तो आनंदाने स्वीकारायला हवा. विद्यार्थी व शिक्षकांनी आपल्याला हे जमेल की नाही, ही भीती काढून टाकायला हवी, असेही त्या म्हणाल्या.

नवीन पाठ्यपुस्तके ज्ञान प्रगल्भ करणारी आहेत. अनेक ‘लिंक’ आणि संदर्भ त्यात दिलेले असून, त्याआधारे विद्यार्थी एखाद्या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेऊ शकतात. घेतलेल्या माहितीचा उपयोग व्यावहारिक जगात कसा करावा, ही माहिती देण्याचा प्रयत्न आहे. परीक्षा पद्धती बदलली आहे. मूल्यांकनाचे निकष बदलले आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी अतिरिक्त ताण न घेता हे बदल समजून घेणे गरजेचे आहे. 

बालभारतीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभ्यासक्रमातील बदल हा नियमिततेतचा भाग आहे. मात्र यंदा विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीनंतर ज्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात, त्याची तयारी पूर्ण व्हावी आणि इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत हे विद्यार्थी कुठेही कमी पडू नयेत, या उद्देशाने शक्य ते अमुलाग्र बदल अभ्यासक्रमात करण्यात आले आहेत.

नवीन अभ्यासक्रमाची ठळक वैशिष्ट्ये 

स्वानुभव, स्वविचार, स्वकल्पना व स्वीकृती या चतु:सूत्रीवर आधारित अभ्यासक्रम
अभ्यासक्रमातून तार्किक विचार, कार्यकारणभाव, नवनिर्मिती आणि चिकित्सक प्रवृत्तीची जोपासना
पाठ्यपुस्तकातील माहिती व अभ्यासाचा उपयोग व्यावहारिक जगात कसा करावा, यासंदर्भात मार्गदर्शन