पुणे : प्रतिनिधी
इंजिनीअरिंग डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना काळानुरूप शिक्षण घेऊन उद्योगांमध्ये आणि खासगी कपन्यांमध्ये चांगली नोकरी मिळावी, यासाठी तंत्रशिक्षण मंडळाने डिप्लोमा अभ्यासक्रमात बदल केला आहे. त्यानुसार अभ्यासक्रमात ‘आय स्किम’ लागू केला असून, तृतीय आणि चतुर्थ सत्राच्या अभ्यासक्रमाचे येत्या 15 जून रोजी अध्यापकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे उपसचिव डॉ. एम. आर. चितलांगे यांनी दिली आहे.
राज्यात अभियांत्रिकीच्या डिग्रीचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल नसल्याचे गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये रिक्त राहणार्या जागांवरून दिसून येत आहे. या तुलनेत दहावीनंतर अभियांत्रिकीच्या डिप्लोमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल आहे. डिप्लोमा करणार्या विद्यार्थ्याला अभियांत्रिकीची डिग्री करणार्या विद्यार्थ्यापेक्षा मासिक वेतन अधिक मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे डिप्लोमा अभ्यासक्रमाचा दर्जा व गुणवत्ता अधिक वाढविण्याच्या उद्देशाने आणि विद्यार्थ्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होण्यासाठी अभ्यासक्रमात आय स्किम लागू करण्यात आली आहे.
या आय स्किमनुसार अभ्यासक्रमात सुमारे 50 टक्के बदल झाला आहे. जागतिक आणि देशांतर्गत उद्योगांमध्ये लागणारे कुशल मनुष्यबळ, दर्जात्मक कौशल्यगुण, उद्योगांच्या गरजा, तंत्रज्ञानात सातत्याने होणारे बदल आदी गोष्टींचा अभ्यास करून हा नवा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांला तीन वर्षाच्या कालावधीत प्रत्येक विषयासाठी मायक्रो प्रोजेक्ट राहणार असून त्याला दहा गुण राहणार आहेत. तसेच, शेवटच्या वर्षाला मुख्य प्रोजेक्ट आणि मायक्रो प्रोजेक्ट करावा लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रात्याक्षिकावर अधिक भर द्यावा लागणार आहे. तसेच, या आय स्किमनुसार विद्यार्थ्यांना उद्योग अथवा कंपन्यांमध्ये चार महिन्याची इंटर्नशीप करणे अनिवार्य राहणार आहे. त्यासाठी मंडळाने टाटा मोटर्स, महिन्द्र अँड महिन्द्र, एल अँड टी, फिआयट, पर्सिस्टंट, किर्लोस्कर इंजीन्स अशा कपन्यांशी करार केला आहे, असे मंडळाचे उपसचिव डॉ. एम. आर. चितलांगे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना डिप्लोमाच्या प्रथम वर्षाला 12 ते 15 जणांच्या गटाने प्रत्येक विषयात मायक्रो प्रोजेक्ट करावा लागेल. तर, द्वितीय वर्षाला 10 जणांच्या गटाने प्रत्येक विषयात मायक्रो प्रोजेक्ट करायचा आहे. तसेच, अंतिम वर्षाला चार ते पाच विद्यार्थ्यांनी मिळून मुख्य प्रोजेक्ट व मायक्रो प्रोजेक्ट करायचा आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार प्रत्येक विषयाचा 70 गुणांचा लेखी पेपर विद्यार्थ्यांना सोडवायचे आहे. तर, 20 गुणांची चाचणी परीक्षा आणि 10 गुण संबंधित मायक्रो प्रोजेक्टला राहणार आहेत. विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी 100 पैकी एकूण 40 गुण लागणार असून त्यात किमान 28 गुण लेखी परीक्षेत असणे गरजेचे आहे.