Thu, Jul 18, 2019 04:04होमपेज › Pune › पिंपरी, कासारवाडीत मेट्रो मार्गात बदल 

पिंपरी, कासारवाडीत मेट्रो मार्गात बदल 

Published On: Jun 30 2018 1:19AM | Last Updated: Jun 30 2018 12:55AMपिंपरी : मिलिंद कांबळे

पिंपरी-चिंचवड शहरात पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील दापोडी  ते निगडी या बीआरटीएस मार्गामध्येच पुणे मेट्रोने मार्गिकेचे काम केले आहे. त्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेने आक्षेप घेतल्याने सदर काम थांबविण्यात आले आहे. मेट्रोने नव्याने मार्गाचा आराखडा तयार करून मार्गात तब्बल दीड किलोमीटर अंतरात बदल केला आहे. पिंपरीत 663.404 मीटर आणि कासारवाडीत 979.41 मीटर असे एकूण 1 हजार 642.814 मीटरचा मार्ग बदलला आहे.

मेट्रोचे काम ग्रेडसेपरेटरच्या एक्सप्रेस वेवरील दुभाजकावरून सुरू आहे. मात्र, खराळवाडीच्या पुढे पिंपरी ते मोरवाडी चौकातील सेंटर मॉलपर्यत बीआरटीएस लेनमधून मेट्रोचे बिनदिक्कत काम सुरू केले होते. पूर्वीच्या आराखड्यानुसार पदपथावरून मेट्रो मार्गिका करण्याचे नियोजन होते. मात्र, पदपथावर विविध सेवावाहिन्या असल्याने कामांस विलंब होईल, म्हणून बीआरटीमधून काम सुरू केल्याचे मेट्रोच्या अधिकार्‍यांनी सांगितले होते. तसेच, कासारवाडीतील बीआरटीएस लेनमधून कामास प्रारंभ करण्यात आला होता.

पदपथात्या संदर्भात छायाचित्रासह ‘पुढारी’ने ‘मेट्रोने बदलला पुन्हा मार्ग; बीआरटीएस मार्गाची लागणार वाट’ या शीर्षकाखाली सर्वांत प्रथम 24 एप्रिलला प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले होते. त्यानंतर मेट्रोच्या संबंधित अधिकार्‍यांची चर्चा करून सदर काम थांबविण्याचा सूचना दिल्या होता. त्या ठिकाणीची पाहणी आयुक्त श्रावण हर्डीकर व मेट्रोच्या अधिकार्‍यांनी 30 एप्रिलला केली. आयुक्तांनी पिंपरी व कासारवाडीत काम न करण्याचा सक्त सूचना दिल्या.

त्यानुसार मेट्रोने या पिंपरी व कासारवाडीत मार्ग बदलण्यासाठी पुन्हा सर्व्हे केला. त्यानुसार पिंपरीत 663.404 मीटर आणि कासारवाडीत 979.41 मीटरचा मार्ग मेट्रोने बदलला आहे. बीआरटीएस मार्गातून पिलर न बांधता बीआरटीएसच्या बाहेर सर्व्हिस रस्तावर बॅरीकेटसला लागून पिलर उभे केले जाणार आहेत. तसे, पत्र मेट्रोने 31 मे रोजी पालिकेस पाठविले. त्या संदर्भात दिर्घ रजेवरून 4 जूनला रूजू झालेले आयुक्तासोबत पालिका अधिकार्‍यांची बैठक झाली. नव्या मार्गास आयुक्तांनी सहमती दिली असून, तसे पत्र पालिका लवकरच मेट्रोला पाठविणार आहे. 

सेवा रस्त्यांवरील मेट्रोमार्गामुळे रस्ता होणार अरूंद

पुणे-मुंबई जुना महामार्गावर पालिकेने 12.50 किलोमीटर अंतराचा ग्रेडसेपरेटर बांधला आहे. हा 61 मीटरचा 10 पदरी प्रशस्त रस्ता आहे. सर्व्हिस रस्ता 10.50 मीटर व  बीआरटी लेन 3.50 मीटर आहे. सर्व्हिस रस्त्यावर अडीच मीटर रूंदीचे मेट्रो पिलर येणार असल्याने हा रस्ता आणखी अरूंद होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होणार आहे. भविष्यात मेट्रो  ग्रेडसेपरेटरच्या पिंपरी ते निगडी मार्गावरील एम्पायर इस्टेट येथील मदर तेरेसा उड्डाणपुल, चिंचवड स्टेशन येथील पुलाचा चौक, आकुर्डीतील पुलाचा चौक आणि निगडीतील पुलाचा चौकामुळे मेट्रोचा मार्ग सर्व्हिस रस्त्यावरूनच असणार आहे. त्यामुळे भविष्यात पिंपरी ते निगडीपर्यंतचा एका बाजूचा सर्व्हिस रस्ता अधिक अरूंद होऊन वाहतुक समस्या गंभीर बनण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पिंपरीत केलेला लाखोंचा खर्च वाया

पिंपरी चौकात तसेच, मोरवाडी चौक व सेंट्रल मॉल येथे मेट्रोने खोदाई करून फाउंडेशन व पिलर उभे केले आहे. पालिकेने आक्षेप घेतल्यापासून सदर काम एप्रिल अखेरीपासून बंद ठेवले आहे. आता नव्या मार्गावरून मेट्रो मार्गिका केली जाणार असल्याने तयार केलेले पिलर व खड्डे बुजविण्यात येणार आहेत. तसेच, बीआरटीएसचे बॅरिकेटस पुन्हा बसवावे लागणार आहेत. यामुळे मेट्रोचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.