Wed, Nov 14, 2018 22:57होमपेज › Pune › चांदणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गालबोट

चांदणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गालबोट

Published On: Aug 10 2018 1:24AM | Last Updated: Aug 10 2018 1:01AMपुणे : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाबरोबरच इतर मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुण्यामध्ये हिंसक वळण लागले. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलनानंतर तरुणांच्या एका टोळक्याने कार्यालयाच्या प्रवेशद्वाराची नासधूस करीत, घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे तेथील वातावरण काही काळ तणावाचे बनले होते; तसेच चांदणी चौक आणि नगर रोडवरही काही गाड्यांची तोडफोड झाल्याने, पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून बळाचा वापर करावा लागला. पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातही सर्वत्र कडकडीत बंद, किरकोळ घटना वगळता शांततेत पार पडला.

सकाळपासूनच शहरात दुकाने, बाजारपेठा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्स्फूर्तपणे बंद ठेवत कडकडीत बंद पाळण्यात आला होता. ठिकठिकाणी मराठा समाजातील तरुणांनी दुचाकी रॅली काढून घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाची सांगता झाल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिल्यानंतर एका टोळक्याने कार्यालयाच्या भिंतीवरून चढत सुरक्षारक्षकाच्या केबिनची तोडफोड केली; तसेच गेटवर असलेला लॅम्प आणि इमारत उद्घाटनाचा बोर्ड तोडला. 70 ते 80 तरुणांच्या या टोळक्याने मुख्यमंत्री आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून जिल्हाधिकार्‍यांना सामोरे येण्याची मागणी केली. या टोळक्याने जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी वेळीच त्यांना रोखून धरले. अखेर जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे पुन्हा एकदा समोर आले. त्यांनी सरकारच्या बाजूने भूमिका मांडली. परंतु, या टोळक्याने त्याला न जुमानता घोषणाबाजी सुरूच ठेवली. चांदणी चौकातही दुपारपर्यंत शांततेत असलेले आंदोलन नंतर चिघळले. पोलिसांवर दगडफेक झाली; तर काही ठिकाणी जाळपोळही करण्यात आली. पोलिसांनी लाठीमार तसेच अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. नगररोडवरील हयात हॉटेलमध्ये कार्यक्रम बंद पाडण्यात आला. 

धुडगूस घालणारा मराठा समाज नाही

क्रांती मोर्चा समन्वयकांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिल्यानंतर हे आंदोलन संपले होते; नंतरच्या तोडफोडीशी मराठा आंदोलकांचा संबंध नाही. टोळक्यास मी स्वतः हात जोडून नासधूस न करण्याची विनंती केली होती. मराठा आंदोलन बदनाम करण्याच्या उद्देशाने हा गोंधळ घातल्याचे प्रवीण गायकवाड यांनी सांगितले.