Thu, Jul 18, 2019 16:32होमपेज › Pune › चंदन तस्करांना अभय कोणाचं!

चंदन तस्करांना अभय कोणाचं!

Published On: Mar 11 2018 1:02AM | Last Updated: Mar 10 2018 11:30PMपुणे : समीर सय्यद

पुण्याला लाभलेल्या टेकड्या आता पुणेकरांपेक्षा चोरट्यांचे अड्डे अन् चंदनचोरांचे कुरण बनत असल्याचे पाहायला मिळत असून, याच टेकड्यांवर सुगंध देणार्‍या चंदनाच्या झाडांची बिनदिक्क्कत तस्करी केली जात आहे. वनविभाग आणि पोलिस यंत्रणेला मात्र याकडे गांभीर्याने पाहायला वेळ नसल्याने या चोरट्यांना नेमके अभय कोणाचे, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

शहरालगत वनविभागाचे सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यातही पुण्याच्या परिघात असलेल्या, वेताळ आणि हनुमान टेकडीवर गेल्या काही दिवसांपासून चंदनाच्या झाडांची कत्तल झाल्याचे दिसून येत आहे. शहरालगत असलेल्या राम टेकडी, डहाणूकर कॉलनीजवळील टेकडी, गणपती टेकडी, तळजाई टेकड्यांची ही परिस्थिती वेगळी नसल्याचे दिसून येत आहे. या टेकड्यांसह वनविभागाच्या अधिकारात असणार्‍या क्षेत्रावर विविध प्रजातीचे वृक्ष आहेत.

त्यात चंदनाच्या वृक्षांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. शहर परिसरात 25 हजाराच्या जवळपास, तर राज्यात 8 ते 10 लाख चंदनांची झाडे आहेत. चंदन चोरीची 2016 मध्ये 19 प्रकरणे दाखल झाली असून, त्यातील केवळ सात प्रकरणांचा छडा लावण्यात प्रशासनाला यश आले आहे. 2017 मधील 18 पैकी केवळ 4 प्रकरणातील आरोपींपर्यंत पोचता आले. चालु वर्षात केवळ एक प्रकरण दाखल झाले आहे.

टेकड्यांवर होत असलेल्या चंदन तस्करीमध्ये उच्चभ्रु तस्करांचा समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. टेकड्यांवर चंदनाचे झाड येताच, त्यावर चोरट्यांची नजर जाते. मात्र, हे चंदन त्याक्षणी न कापता त्याला मोठे होऊ दिले जाते. या झाडांमध्ये चंदनाचा गाभा तयार झाल्यानंतर हे तस्कर बिनदिक्क्कत हे झाड चोरून नेत आहेत.

आयुर्वेदिक औषधात चंदनाचा वापर

पूर्ण वाढ झालेल्या चंदनाच्या झाडाची किंमत सुमारे एक ते दीड कोटीच्या घरात आहे. गेल्या काही वर्षापासून आयुर्वेदाकडे सर्वांचा कल वाढत आहे. गुणकारी आणि साईड इफेक्ट नसल्यामुळे आयुर्वेदाला पसंती मिळत आहे. ही बाब विचारात घेऊन औषधे तयार करण्यासाठी अन्य वनौषधींबरोबरच चंदनालाही आयुर्वेदिक कंपन्यांकडून प्रचंड मागणी आहे.