Thu, Jul 18, 2019 08:48होमपेज › Pune › आव्हान प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविणार

आव्हान प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविणार

Published On: Jun 14 2018 1:35AM | Last Updated: Jun 14 2018 12:37AMपुणे : प्रतिनिधी

गिर्यारोहणातील हे धाडस 10 ते 16 वयोगटातील मुलामुलींनी अनुभवावे व एक साहसी पिढी तयार व्हावी, या विचाराने गिरिप्रेमी गेली 12 वर्षे ‘आव्हान’ हा उपक्रम राबवित आहे. यंदाच्या वर्षी हाच उपक्रम गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगतर्फे ‘आव्हान’, ‘निर्माण’ व ‘उडान’ या तीन स्तरांवर राबविला जाणार आहे, अशी माहिती गिरिप्रेमीचे गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी दिली. 

डोंगरयात्रा, भटकंती, प्रस्तरारोहण, सह्याद्रीचा इतिहास, गिर्यारोहणातील इतर तांत्रिक प्रशिक्षण, पर्यावरण अभ्यास, फोटोग्राफी इत्यादी विषय या उपक्रमाअंतर्गत शिकवण्यात येणार आहेत. गिर्यारोहणातून जोपासली जाणारी संघभावना, नेतृत्त्व, समयसूचकता, आशावाद, संयम आदी कौशल्ये या अभ्यासक्रमातून प्रत्यक्ष अनुभवातून मुलामुलींना शिकवण्यात येतील. 

हा पूर्ण अभ्यासक्रम एकूण 12 महिन्यांत विभागलेला असून, साधारण दर महिन्याला एक, दिवाळीच्या सुटीत 3-4 दिवस आणि उन्हाळ्याच्या सुटीत 8-10 दिवस असा एकूण कालावधी असेल; तसेच इन्स्टिट्यूटच्या सक्षम प्रशिक्षकांकडून शिस्तबद्धपणे राबविला जाईल. उपक्रमाच्या शेवटी सर्व प्रशिक्षार्थींना जी.जी.आय.एम.तर्फे प्रशस्तीपत्रक देण्यात येईल. 

नव्या पिढीला आजच्या प्रतिकूल सामाजिक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी केवळ बौद्धिक प्रगती पुरेशी नाही तर त्याचबरोबर धाडसी प्रवृत्ती व सुदृढ शरीराची नितांत आवश्यकता आहे. ‘आव्हान’, ‘निर्माण’ व ‘उडान’ या उपक्रमांतून मुलामुलींच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधणे शक्य होईल. या उपक्रमासाठी नोंदणी लवकरच सुरू होणार असून, त्यासाठीची पहिली बैठक दि. 18 रोजी सकाळी 9.30 वाजता पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रोड याठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी आणि उपक्रमाबाबत गिरिप्रेमीचे भूषण हर्षे याच्याशी संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उपक्रमाचे उमेश झिरपे यांनी केले आहे.