Mon, Apr 22, 2019 21:55होमपेज › Pune › पक्षाचे अस्तित्व टिकविण्याचे आव्हान

पक्षाचे अस्तित्व टिकविण्याचे आव्हान

Published On: Jul 08 2018 1:45AM | Last Updated: Jul 08 2018 1:01AMपुणे : शंकर कवडे

शहराचा विकास आणि नागरिकांच्या प्रश्‍नांबद्दल आक्रमकता दाखवून आंदोलने, मोर्चे आणि पाठपुरावा करणार्‍या शिवसेनेची गेल्या काही वर्षांत पिछेहाट होताना दिसत आहे. पक्षाचे बालेकिल्ले म्हणविल्या जाणार्‍या मतदारसंघात मागील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा राहिला. भाजपच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेची ताकद निर्माण करण्यासाठी शिवसैनिकांना वरिष्ठ पातळीवरून बळ मिळण्याची गरज आहे. मात्र, नव्याने निवडल्या गेलेल्या शहराध्यक्षांनी शहराऐवजी स्वत:च्या मतदारसंघात लक्ष केंद्रित केल्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये शहरातील पक्षाचे अस्तित्व टिकविण्याचे आव्हान शिवसैनिकांपुढे उभे ठाकले आहे.  

काँग्रेस पक्षातून घरवापसी केलेल्या विनायक निम्हण यांनी शहराध्यक्षपदाची सूत्रे सांभाळल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली मरगळलेल्या शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य संचारले होते. यादरम्यान, पक्षाकडून विविध प्रकारची आंदोलने हाती घेत ते तडीस नेण्याचा रेटा शिवसैनिकांनी लावला. पक्षातील अनुभवी आणि एकहाती नेतृत्व असल्याने शहरात शिवसेनेचे पारडे जड होण्यास सुरवात झाली. मात्र, महापालिका निवडणुकांमध्ये पक्षाचा दारूण पराभव झाल्यानंतर विनायक निम्हण यांनी नैतिक जबाबदारी स्विकारत पक्षाकडे राजीनामा सादर केला. त्यानंतर, नवीन वर्षाच्या मूहूर्तावर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पुणे शहर व विधानसभा कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये शहरप्रमुखांपासून शाखाप्रमुखांपर्यंत तब्बल 561 जणांचा समावेश करण्यात आला होता. या जंम्बो कार्यकारीणीतील शहरात 46 तर विधानसभा कार्यकारणीत 515 अशी 561 जणांची टीम उभारण्यात आली. शहराला मिळालेल्या दोन शहराध्यक्षांमुळे पक्षाची ताकद वाढेल अशी अपेक्षा होती. 

शहराला माजी आमदार चंद्रकांत मोकाटे व महादेव बाबर हे दोन शहरप्रमुख आहेत. मोकाटे यांच्याकडे कसबा, कोथरूड, शिवाजीनगर, व खडकवासला असे चार व बाबर यांच्याकडे हडपसर, वडगाव शेरी, पर्वती व कॅन्टोन्मेट असे चार विधानसभा मतदार संघ देण्यात आले आहेत. याखेरीज, शहरात आमदार निलम गोर्‍हे, माजी आमदार विनायक निम्हण, चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर यांसह जुन्या जाणत्या नेत्यांची मोठी फौज शिवसेनेत आहे. यासर्वांनी पक्ष हितासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. गेल्या महापालिका निवडणुकांमध्ये पक्षाचे दहा नगरसेवक निवडून आले. त्यामुळे, या प्रभागांमध्ये पक्षाचे अस्तित्व टिकून आहे. पक्षाच्या वाढीसाठी स्थानिक पातळीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. जुन्या-नव्या नेतृत्वाची सांगड घालून सर्वांना विश्‍वासात घेऊन ठोस नेतृत्व देण्याची आवश्यकता आहे. 

शहरातील विविध भागात शाखा स्तरावर राबविले जाणारे लोकोपयोगी उपक्रम ही शिवसेनेची शक्ती आहे. मात्र, मध्यंतरी कालखंडात या सर्व गोष्टी थांबल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ पातळीवर दखल घेतली जात नसल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पिछेहाट झाल्याने पक्षाला शहरात पुन्हा एकदा ताकद वाढविण्याची संधी आहे. मध्यमवर्गीयांच्या नजरेत तडजोडवादी पक्ष अशी प्रतिमा झाल्याने ही ओळख पुसणे सेनेपुढील सर्वात मोठे आव्हान आहे. तरच मनसेकडे गेलेला तसेच शिवसेनेवर नाराज झालेला शिवसैनिक पुन्हा आपल्याकडे वळवावा लागणार आहे. शिवसेनेने युवा सेनेची जोरदार सुरवात केली. 

मात्र, याठिकाणीही सक्षम नेतृत्व आणि तरूणाईला आकर्षित करण्यास पक्ष अपयशी ठरला आहे. रिक्षासेना, वाहतूक सेना, चित्रपटसेना, माथाडी कामगार सेना आदी संघटनांची सक्रीयताही कमी झाली आहे. त्यामुळे समाजपयोगी कामांमधून शिवसेनेचा विस्तार हे मूळध्येय राबविण्याचा विसर सध्याच्या कार्यकारिणीला पडला आहे.