Wed, May 22, 2019 10:31होमपेज › Pune › नवनियुक्‍त अधिकार्‍यांसमोर ‘स्ट्रीट क्राईम’चे आव्हान 

नवनियुक्‍त अधिकार्‍यांसमोर ‘स्ट्रीट क्राईम’चे आव्हान 

Published On: Jul 29 2018 1:24AM | Last Updated: Jul 29 2018 1:05AMपुणे : प्रतिनिधी

नव्याने स्थापन झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाअंतर्गत डॅशिंग अधिकार्‍यांची एन्ट्री झाली आहे. तर, पुण्यातही अनेक ठिकाणी नव्या अधिकार्‍यांची वर्णी लागली आहे. पुण्यातील स्ट्रीट क्राईम आणि पिंपरी-चिंचवडमधील टोळी युद्ध, गोळीबार आणि तोडफोडीचे सत्र रोखण्याचे आव्हान या नव्या अधिकार्‍यांना असेल. वाढत्या गुन्हेगारीमुळे आधीच भयग्रस्त अवस्थेत असलेल्या नागरिकांना नवनियुक्त अधिकार्‍यांकडून शहर भयमुक्त होईल, अशी अपेक्षा आहे. धडाकेबाज अधिकार्‍यांना हे आव्हान पेलवणार का? हे येत्या काळात समोर येईल.  

लोकसंख्या वाढली की, गुन्हेगारीत वाढ होते, असे म्हटले जाते. चोहीबाजूंनी वेगाने वाढत असलेल्या दोन्ही शहराबाबतही सध्या हेच घडत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या जवळपास 60 ते 65 लाखांच्या घरात पोहचली आहे. 

या ठिकाणी गुन्हेगारी फोफावत असून, विशेषत: पिंपरी-चिंचवड  शहर गोळीबार, खून आणि वाहनांच्या तोडफोडीच्या घटनांनी कायमच धुसमत आहे. किरकोळ गुन्ह्यांची तर नोंद ठेवणे कठीण आहे. वाढत्या गुन्हेगारीला आवर घालण्यासाठीच पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालय देण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. यंदा ती पूर्ण होऊन एकदाचे पिंपरी-चिंचवडकरांना स्वतंत्र पोलिस आयुक्तालय मिळाले. 

येत्या 15 ऑगस्टला आयुक्तालय सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आयुक्तालयाच्या जागेवरही शिक्कामोर्तब झाले. त्या पार्श्‍वभूमीवर वरिष्ठ अधिकार्‍यांसह इतरांच्या बदल्या करण्यात आल्या.   घरफोड्या, सोनसाखळी चोरी आणि लूटमार, स्ट्रीट क्राईम, अवैध धंदे काही केल्या कमी होत नाहीत. त्यामुळे नव्याने आलेल्या अधिकार्‍यांवर पुणेकरांना सुरक्षित वातावरण देण्यासोबतच स्ट्रीट क्राईम रोखण्याचे आव्हान असणार आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या गुन्हेगारीची डोके दुखी

पिंपरी-चिंचवड शहराचे अप्पर पोलिस आयुक्त म्हणून आलेल्या मकरंद रानडे यांनी पूर्वी पुण्यात धडाकेबाज कामगिरी केलेली आहे. ते ठाणे शहरातून पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात आले असून, त्यांनी पुण्यात 2010 ते 2013 या कालावधीत परिमंडळ एक, विशेष शाखा तसेच मुख्यालय पोलिस उपायुक्त म्हणून काम केले आहे. परिमंडळ एक येथे असताना गणेशोत्सव आणि मिरवणूक  शांततेत पार पाडली. पूर्वीची त्यांची कामाची पद्धती पाहता पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारांना जरब बसेल, अशी आशा पोलिस दलासह नागरिकांना आहे.  

पुणे जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये अनेक वर्षांनंतर कडक शिस्त पाहायला मिळत होती. शिस्तीचा अधिकारी म्हणून ओळख निर्माण केलेल्या सुवेज हक यांच्या जागी आता सातार्‍याचे संदीप पाटील यांची वर्णी लागली आहे. सातार्‍यात असताना पाटील यांनी तेथील गुन्हेगारांवर प्रथमच मोक्कासारख्या कायद्यान्वये कारवाई केली. तर, राज्यभर गाजलेले वाई हत्याकांडही केवळ निवेदनावरून उघडकीस आणले होते. संदीप पाटील हेही पोलिस दलात कडक शिस्तीचे अधिकारी असा दरारा निर्माण केलेले अधिकारी आहेत. त्यांनी अवैध धंदे चालवणारे सापडल्यानंतर अधिकारी, कर्मचार्‍यांवर निलंबनासारखी कारवाई  केली होती. त्यामुळे पुण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांना  पाटील यांच्या शिस्तीतच काम करावे लागणार आहे.  कामाच्या या अनोख्या पद्धतीने त्यांनी सातारकरांची मने जिंकली होती. त्यामुळेच आज (रविवारी) मूक मोर्चा काढून सातारकर पाटील यांची बदली रद्द करावी, अशी मागणी करणार आहेत. 

पुण्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या गुन्हे पोलिस आयुक्तपदी येणार्‍या नवीन अधिकार्‍याला धडाकेबाज काम करावे लागणार आहे.  महाराष्ट्र पोलिस दलातील बदल्या तसेच  शहर दलातील अंतर्गत बदल्याच्या काळात  गुन्हे शाखा सुस्तावली आहे. तर, काही युनिटच्या कामगिरीवरून पोलिस दलातच चर्चा सुरू झाली आहे. याकडेही नव्या आयुक्‍तांना लक्ष द्यावे लागणार आहे. शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गुन्हे शाखा या चोरट्यांचा माग काढूनही हाती काही लागत नसल्याचे दिसत आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्यांना शुक्रवारी रात्री मुहूर्त लागला. गृहविभागाने पोलिस उपायुक्‍त, पोलिस अधीक्षक, उपमहानिरीक्षक आणि महानिरीक्षक दर्जाच्या एकूण 95 अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहे. काही जणांना पदोन्नतीही देण्यात आली आहे.