Thu, Apr 25, 2019 17:37होमपेज › Pune › चाकणच्या सूत्रधाराचा शोध गरजेचा!

चाकणच्या सूत्रधाराचा शोध गरजेचा!

Published On: Aug 07 2018 1:01AM | Last Updated: Aug 07 2018 12:30AMसुहास जगताप

गेल्या आठवड्यात मराठा आरक्षणाच्या निरनिराळ्या मागण्यांवरून जिल्हाभर निरनिराळ्या प्रकारे अनेक आंदोलने होत राहिली. चालू आठवड्यातही अशी आंदोलने सुरूच राहणार आहेत, अशी चिन्हे दिसत आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात चाकण येथे झालेली हिंसाचाराची घटना मात्र चिंताजनक आहे. पोलिसांनी या प्रकरणी अटकसत्र सुरू केले आहे. अनेकांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांपुढे खरे आव्हान या हिंसाचारामागील सूत्रधार शोधण्याचे आहे. कारण अत्यंत नियोजनबद्धपणे हा हिंसाचार घडवून आणलेला दिसतो. या हिंसाचारामध्ये अनेक बाबी आकलनशक्तीच्या पलीकडच्या आहेत. खरोखरच आंदोलक चिडलेले होते तर ते लगेच दुसर्‍या दिवशी शांत कसे झाले? आंदोलक असतील तर ते पोलिसांवर दगडफेक करण्याएवढेे निर्ढावलेले कसे असू शकतात? सकल मराठा समाजाचा मोर्चा तळेगाव चौकात जाण्यापूर्वीच तीन-चार हजारांचा मोठा जमाव तळेगाव चौकात कसा जमला? अशा असंख्य प्रश्‍नांची उत्तरे पोलिसांना शोधवी लागणार आहेत. 

पोलिसांनी कारवाई जरूर केलीच पाहिजे; परंतु तसे करताना निरपराध लोकांना त्रास होणार नाही याची काळजी कसोशीने घेण्याची गरज आहे; परंतु पोलिसांनी या हिंसाचाराच्या मुळाशी निश्‍चितपणे जावे. मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी हिंसाचार घडवला गेला, असा आरोप केला गेला आहेच; त्यामुळे या हिंसाचारामागचा सूत्रधार शोधणे फार गरजेचे झाले आहे. या सूत्रधारावरून चाकण परिसरात मोठी चर्चाही सुरू आहे. राजकीय हिशेब चुकविण्यासाठी तर हा हिंसाचार घडविण्यात आला नाही ना, अशीही चर्चा सुरू आहे. मराठा समाजाने लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलनाचा कार्यक्रमही जाहीर केला होता; पण जिल्ह्यात आमदार राहुल कुल आणि शरद सोनवणे यांच्याच घरांसमोर फक्त ठिय्या आंदोलन झाले. 

मराठा आंदोलनाची धग जोरात असताना धनगर समाजाने आपल्या आरक्षण  मागणीसाठी एल्गार पुकारला आहे. त्यांचे आंदोलनही जोर पकडण्याच्या तयारीत आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर आरक्षणाचा प्रश्‍न सोडविला जाईल, असे सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी बारामतीत धनगर समाज आंदोलनाच्या वेळी जाहीर केले होते; तो मुद्दा धनगर समाजाने लावून धरला आहे.  पुणे जिल्ह्यात तरी हा मुद्दा जोर पकडत आहे. आरक्षणाच्या प्रश्‍नावर सरकारने आता लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज आहे. तसे न झाल्यास पुणे जिल्ह्यात मराठा आणि धनगर समाज आंदोलन सुरू झाल्यास आवरणे कठीण होईल. 

पावसाचे डोळे वटारलेलेच

पावसाने जिल्ह्याच्या मोठ्या भागावर अद्याप डोळे वटारलेले आहेत. विशेषतः दौंड, इंदापूर, शिरूर, बारामती, आंबेगाव या तालुक्यांच्या मोठ्या भागात अद्याप पाऊस झालेला नाही. विहिरी अद्यापही कोरड्याठाक आहेत. पाझर तलाव, बंधारे, ओढे, नाले कोरडे आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे लक्ष आकाशाकडे लागले आहे. चारा, पिण्याचे पाणी याची स्थिती आगामी काळात गंभीर होण्याची शक्यता आहे. अजूनही दोन महिने आहेत. पाऊस पडेल या आशेवर लोक आहेत. प्रशासनाने मात्र आताच जागे होण्याची गरज आहे. धरणक्षेत्रात पाऊस पडत असल्याने नदी पात्रे आणि कालव्यात पाणी सोडले होते; परंतु आता धरण भागातही पाऊस पडणे बंद झाले आहे. कालव्यातून सोडण्यात येणार्‍या पाण्याने तलाव भरून घेण्याच्या मागणीकडे यावर्षीही दुर्लक्ष केले गेले आहे. 

नवे पोलिस अधीक्षक

संदीप पाटील या अत्यंत कर्तव्यकठोर पोलिस अधिकार्‍याने या आठवड्यात पुणे जिल्हा पोलिस अधीक्षकपदाचा कार्यभार घेतला आहे. यापूर्वी ते सातारा येथे पोलिस अधीक्षक होते. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी काम केलेले असल्याने जिल्ह्यात शिरकाव करत असलेल्या नक्षलींना आळा घालण्यास त्यांच्या या अनुभवाचा फायदा होईल. पदभार घेतल्याच्या दुसर्‍याच दिवशी त्यांना चाकण दंगलीला तोंड द्यावे लागले. अत्यंत तातडीने हालचाली करून त्यांनी ही दंगल आटोक्यात आणली. दुसर्‍याच दिवशी त्यांनी चाकण पूर्वपदावर आणले. पुणे जिल्ह्यात त्यांच्यासमोर मोठी आव्हाने आहेत. वाळू तस्कर, जमनी बळकावणारे, औद्योगिक पट्ट्यात दादागिरी करणारे यांना आवर घालण्याचे मोठे आव्हान संदीप पाटील यांच्यासमोर आहे. याबरोबरच पोलिस प्रशासनात कमालीचा रस असणार्‍या राजकारण्यांची महाराष्ट्रात सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात आहे. त्यांना योग्य अंतरावर ठेवण्याची मोठी कसरत पाटील यांना कराावी लागेल.