होमपेज › Pune › राजकारणानंतर दहावीतही यशस्वी

राजकारणानंतर दहावीतही यशस्वी

Published On: Jun 10 2018 1:49AM | Last Updated: Jun 10 2018 1:41AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका तिजोरीच्या चाव्या हाती असलेल्या स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांनी कोेट्यवधींची उलाढाल समर्थपणे सांभाळत दहावीची परीक्षाही 55 टक्के गुण मिळवून उत्तीर्णपणे पार केली आहे. तर, भाजपच्या नगरसेविका व ‘फ’ क्षेत्रीय समिती अध्यक्षा कमल घोलप यांनीही दहावीत 72 टक्के गुण संपादित करीत आम्हीही मागे नसल्याचे दाखविले. 

प्रभाग क्रमांक 26 ‘अ’ मधील जागा महिला राखीव झाल्याने त्यांनी भाजपकडून निवडणूक लढविली. त्यात त्या विजयीही झाल्या. तब्बल सहा वर्षांच्या खंडानंतर अभ्यास करताना अडचणी आल्या. पालिका निवडणूक, वर्ष संपत नाही तोच स्थायी समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्याने त्यांच्या अभ्यासात व्यत्यय आला. मात्र, त्यावर मात करीत पती विनायक यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी पहिल्याच प्रयत्नात दहावीत 55 टक्के गुण मिळवून यश मिळविले आहे. 

निगडीतील प्रभाग क्रमांक 13 ‘अ’च्या भाजपच्या नगरसेविका कमल घोलप यांचे नववीपर्यंतचे शालेय शिक्षण 1996 ला रायगड जिल्ह्यातील मानगावातील शाळेत झाले आहे. काही अडचणीमुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही. अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, तशी संधी मिळत नव्हती. अखेर निर्णय पक्का करीत त्यांनी तब्बल 21 वर्षांच्या खंडानंतर दहावीचा परीक्षा अर्ज भरला. 

शिक्षणासाठी त्यांना पती अनिल यांचे पाठबळ मिळाले. पहिल्याच प्रयत्नात 72 टक्के गुणांनी प्रथम वर्गात उत्तीर्ण झाल्याने त्यांच्यासह संपूर्ण कुटुंब आणि त्यांचे समर्थक आनंदोत्सव साजरा करीत आहेत. 

काम सांभाळात दहावीचा अभ्यास करता आला आणि उत्तीर्णही झाले. त्यामुळे माझा उत्साह वाढला आहे. आता अकरावीला कला शाखेत प्रवेश घेणार आहे. कोणत्याही स्थितीत पदवीपर्यंत शिक्षण घेणार आहे.  - ममता गायकवाड

कमी शिकलेल्या नगरसेविका अशी टीका होऊ लागली. त्यामुळे थांबलेले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच प्रयत्नात 72%गुणांनी उत्तीर्ण झाल्याने आनंद झाला. आता बारावीची परीक्षा देणार आहे. - कमल घोलप