Wed, Mar 20, 2019 23:05होमपेज › Pune › प्रसंगी दिल्लीतही आंदोलनाची तयारी ठेवावी

प्रसंगी दिल्लीतही आंदोलनाची तयारी ठेवावी

Published On: Feb 13 2018 2:01AM | Last Updated: Feb 12 2018 10:47PMदेहूरोड : वार्ताहर

देहूरोड तसेच दिघी, भोसरी, तळवडे या भागातील रेडझोन रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. 12 )  रेडझोन संघर्ष समितींअंतर्गत रेडझोन संघटनेच्या वतीने देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयासमोर लाक्षणिक साखळी उपोषण सुरू करण्यात आले. वेळ पडल्यास दिल्लीतही आंदोलनाची तयारी करावी लागणार असल्याचा सूर यावेळी उपोषणात सहभागी कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला.

येथील दारूगोळा कोठारामुळे लागू करण्यात आलेला रेडझोन रद्द करावा त्याचबरोबर अन्य मागण्यांसाठी रेडझोन संघटनेच्या वतीने सोमवारी सकाळी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले. रेडझोन संघर्ष समितीचे अध्यक्ष सुदाम तरस, मदन सोनिगरा, यदुनाथ डाखोरे, गणेश चव्हाण, धर्मपाल तंतरपाळे, कांतीलाल काळोखे, देहूच्या सरपंच उषा चव्हाण, पिंपरी चिंचवडचे नगरसेवक पंकज भालेकर, नगरसेविका संगिता भोंडवे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, गोपाळ तंतरपाळे, अ‍ॅड. कैलाश पानसरे, अ‍ॅड. कृष्णा दाभोळे, डॉ. श्रीप्रकाश गलांडे आदींसह संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी आणि शेतकरी यावेळी उपस्थित होते.

सोमवारी सकाळी सर्व कार्यकर्ते बाजारपेठेतील सुभाष चौकात जमले. तेथून रेडझोन हटावच्या घोषणा देत अबुशेठ रस्ता रेल्वेस्थानक मार्गे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयासमोर आले. सकाळी अकराच्या सुमारास उपोषण सुरू करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रेडझोनला विरोध करणारी मते व्यक्त केली.

उपोषणकर्त्यांच्या  प्रमुख मागण्या

संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेली रेडझोनसंबंधी अधिसूचना रद्द करावी.
रेडझोनहद्दीसंबंधी नव्याने अधिसूचना काढण्यात यावी. 
त्याची अंतर मर्यादा 270 मीटर ठेवण्यात यावी.
वर्क्स ऑफ डिफेन्स अ‍ॅक्टप्रमाणे शेती करण्यास निर्बंध लादू नयेत. 
शेतकर्‍यांच्या सात-बारावरील रेडझोनचा शेरा किंवा शिक्का रद्द करावा.