Fri, Apr 26, 2019 01:53होमपेज › Pune › इंधन दरवाढीने अन्‍नधान्य महागले

इंधन दरवाढीने अन्‍नधान्य महागले

Published On: May 30 2018 2:21AM | Last Updated: May 30 2018 1:07AMपुणे : प्रतिनिधी

कर्नाटकची निवडणूक संपल्यानंतर 14 मेपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात सुरू असलेली दरवाढ रविवारपर्यंत कायम राहिली. या 14 दिवसांमध्ये पेट्रोल 3 रुपये 26 पैसे, तर डिझेल 3 रुपये 3 पैशांनी वाढले आहे. परिणामी, गुलटेकडी मार्केटयार्डातील गूळ व भुसार बाजारात सर्व प्रकारच्या अन्नधान्यांच्या दरात क्विंटलमागे 50 ते 75 रुपयांनी, तर भाजीपाला व फळांच्या दरात 5 ते 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अवघ्या 14 दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरातील एवढी वाढ मागील 2 वर्षांतील सर्वाधिक आहे. 

याबाबत दि पूना मर्चंट्स चेंबरचे सहसचिव व व्यापारी विजय मुथा म्हणाले, देशाच्या विविध भागातून गुलटेकडी मार्केटयार्डातील भुसार-गूळ बाजारात दररोज जवळपास 200 ते 250 ट्रक शेतमाल दाखल होतो. गेल्या काही दिवसांपासून डिझेलचे दर वाढल्याने अन्नधान्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. सध्या वाढलेले डिझेलचे दर, विविध कर व जीएसटी मिळून प्रतिकिलोमागे 1 रुपये 20 पैशांनी भाव वाढ झाली आहे. 

यंदा देशभरात शेतमालाचे चांगले उत्पादन झाले आहे. मात्र, वाढलेल्या महागाईचा फायदा हा शेतकर्‍यांना होताना दिसत नाही. तर, सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका हा सर्वसामान्य ग्राहकांना बसताना दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात 10 ते 14 मे दरम्यान मार्केटयार्डातील भुसार बाजारात गव्हाचा प्रतिक्विंटलचा दर हा 2 हजार रुपये व ज्वारीचा 1900 ते 3 हजार रुपये होता. 14 तारखेनंतर गव्हाच्या प्रतिक्विंटलला दर 2 हजार 125 रुपये व ज्वारीचा दर 2 हजार ते 3 हजार 200 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. हीच परिस्थिती इतर अन्नधान्यांच्या बाबतीतही तशीच आहे. 

बाजारात टेम्पोने माल घेऊन येणारा शेतकरी व माल घेऊन जाणारा किरकोळ व्यापारी, या दोघांना टेम्पोचे भाडे द्यावे लागते. डिझेलचे दर वाढल्यामुळे त्याचा भुर्दंड या दोघांना बसतो आणि शेतमालाच्या दरात वाढ झाल्याने खरेदीदराला जास्त किंमत मोजावी लागते. सद्य:स्थितीत वाढलेल्या दरामुळे तरकारी व फळ विभागात भाजीपाला व फळांच्या दरात 5 ते 10 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली. पेट्रोल-डिझेल अद्याप जीएसटीमध्ये आले नसले, तरी महाराष्ट्र सराकारमार्फत त्याआधीच इंधनावर 9 रुपयांचा अधिभार लावण्यात आला आहे. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी दुष्काळी अधिभार या नावाने राज्य सरकार सर्वसामान्यांकडून प्रतिलिटर हा अधिभार वसूल करीत आहे. त्याचा परिणाम इंधन दरावर होत असल्याचे व्यापार्‍यांच्या वतीने सांगण्यात आले.