Sun, Aug 25, 2019 09:02होमपेज › Pune › शेतकर्‍यांच्या उत्पन्न वाढीसाठी सहकाराची महत्त्वाची भूमिका

शेतकर्‍यांच्या उत्पन्न वाढीसाठी सहकाराची महत्त्वाची भूमिका

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

 पुणे : प्रतिनिधी

आपल्या देशातील शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आपल्या प्रधानमंत्र्यांनी सर्वांसमोर ठेवले आहे. आपण शेती आणि संबंधित क्षेत्रांकडे अधिकचे लक्ष देऊ, तेव्हाच हे शक्य आहे. या उद्दिष्टप्राप्तीत सहकार चळवळीची भूमिका महत्त्वाची राहणार असून, सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान देणार्‍या बी. जे. खताळ-पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाची आपल्याला आवश्यकता असल्याचे प्रतिपादन, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बी. जे. खताळ यांच्या शतक महोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा समिती आणि श्री आदिशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याच्या सामाजिक व राजकीय इतिहासाचे साक्षीदार, राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळातील एकमेव हयात मंत्री बी. जे. खताळ-पाटील (दादा) यांच्या शतक महोत्सवी अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे होते.

या वेळी अहमदनगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, उद्योगपती अरुण फिरोदिया, सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, डॉ. शरद हर्डीकर, संगमनेरचे आमदार डॉ. सुधीर तांबे, श्री आदिशक्ती फाउंडेशनचे दत्ता पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या वेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्यावतीने बी. जे. खताळ-पाटील यांना ‘डी. लीट.’ ही पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा डॉ. पी. डी. पाटील यांनी केली. 

राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळाचे साक्षीदार असणारे दादासाहेब खताळ हे नवमहाराष्ट्राच्या निर्मितीचे आणि प्रगतीचेही साक्षीदार आहेत. स्वतंत्र भारताच्या निर्मितीत देशातील अनेक प्रांतातील ज्ञात आणि अज्ञातांनी मोठे योगदान दिले आहे. स्वातंत्र्य लढ्यासह देशनिर्मितीत योगदान असणार्‍या लोकांमध्ये खताळ-पाटील यांचाही समावेश होतो. सहकार क्षेत्राशी त्यांचा जवळून संबंध आला. सहकार ही महाराष्ट्राला मिळालेली देणगी असून, या सहकाराच्या जोरावरच महाराष्ट्र संपन्न झाला आहे. या राज्यात सहकार चळवळ रुजविण्यात आणि वाढविण्यात खताळ-पाटील यांचे योगदान आहे. त्यांच्या या अनुभवाचा महाराष्ट्राला आजही उपयोग होणार आहे. 

कृषिप्रधान असलेल्या भारताने कृषी अर्थव्यवस्थेतून सेवाक्षेत्राच्या अर्थव्यवस्थेकडे मार्गक्रमण केले आहे. देशाच्या एकूण सकल उत्पन्नात सेवाक्षेत्राचा 60 टक्के वाटा असला तरी, या क्षेत्रातून केवळ 24 टक्के रोजगार निर्मिती होते. तर देशाच्या सकल उत्पन्नात केवळ 20 टक्के वाटा असणारे कृषिक्षेत्र 60 टक्के लोकांना रोजगार देते. त्यासाठी आपण कृषिक्षेत्राकडे अधिकचे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडील बहुसंख्य लोक हे अकुशल कामगार आहेत. त्यांचे कुशल मनुष्यबळात रूपांतर करण्याची आवश्यकता असल्याचे सी. विद्यासागरराव यांनी सांगितले.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, बी. जे. खताळ हे आयुष्यभर महात्मा गांधींच्या विचारावरच चालले आहेत. त्यांनी आयुष्यभर तत्त्वनिष्ठा जपली, ते विचारवंत नेता म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे काम केले. उत्तम प्रशासक म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. सहकार क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले आहे. सूत्रसंचालन जीवराज चोले यांनी केले, तर सुरेश कोते यांनी आभार मानले.
 


  •