Sun, Apr 21, 2019 03:49होमपेज › Pune › आधारच्या मशिन दुरुस्त करण्यास केंद्राची परवानगी

आधारच्या मशिन दुरुस्त करण्यास केंद्राची परवानगी

Published On: Dec 05 2017 1:44AM | Last Updated: Dec 05 2017 1:36AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

केंद्र व राज्य सरकारने विविध कामांसाठी आधारकार्ड संलग्न करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शहर आणि जिल्ह्यात आधार नोंदणीसाठी नागरिकांना रांगांमध्ये उभे राहावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाकडे नादुरुस्त असलेल्या 130 मशिन दुरुस्त करण्याची परवानगी केंद्र शासनाकडून मिळाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सोमवारी  दिली.

विधान भवनातील विभागीय कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली, त्यावेळी राव बोलत होते.

या बैठकीत आमदार मेधा कुलकर्णी आणि इतर सदस्यांनी ज्येष्ठ नागरिक ज्यांच्या हाताचे ठसे उमटत नाहीत त्यांच्या फक्त डोळ्यांचे स्कॅनिंग करून आधार उपलब्ध करून देण्याची मागणी केली, यावर जिल्हाधिकारी म्हणाले, पुणे शहर आणि जिल्ह्यात 95 टक्के नागरिकांची आधार नोंदणी झाली आहे. उर्वरित 5 टक्के नागरिकांच्या आधार नोंदणीसाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. प्रशासनाकडे 270 आधारच्या मशिन असून, त्यातील 130 मशिन बंद आहेत. केंद्र सरकारकडून त्या मशिनची दुरुस्तीचा खर्च जिल्हा प्रशासनाने करावा, या तत्त्वावर परवानगी मिळाली असल्याचे राव यांनी सांगितले.

पुणे शहरात 125 आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत 65 आधार केंद्र सुरू आहेत. वृद्ध, आजारी व्यक्तींना आधार नोंदणीचे केंद्रांवर येण्यास अडचण असेल तर त्यांच्यासाठी घरी जाऊन नोंदणीसाठी चार मोबाईल केंद्र सुरू केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.