Sun, Jul 21, 2019 14:46
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › शिवनेरीवर दिमाखदार शिवजन्मोत्सव सोहळा  

शिवनेरीवर दिमाखदार शिवजन्मोत्सव सोहळा  

Published On: Feb 20 2018 1:55AM | Last Updated: Feb 20 2018 1:52AMलेण्याद्री : वार्ताहर

छत्रपती शिवरायांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर सोमवारी (दि. 19) शिवजन्मोत्सव सोहळा पारंपरिक दिमाखदार पद्धतीने पार पडला; मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उत्सवानिमित्त येथे आयोजित सभेला संबोधित करण्याची परंपरा मोडून तातडीने मुंबईला जाणे पसंत केले. मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित अभिवादन सभेच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री राज्याला शिवजयंतीनिमित्त काय संदेश देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेळेत किल्ले शिवनेरीवर उपस्थित झाले; मात्र त्यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन करून लगेचच किल्ले शिवनेरीवरून प्रयाण केल्याने शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. 

शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे किल्ले शिवनेरीवर सकाळी 9 वाजेच्या सुमारास आगमन झाले. त्यानंतर शिवजन्मस्थळ येथे पाळणा जोजावून पारंपरिक पद्धतीने शिवजन्म सोहळा साजरा करण्यात आला. संभाजी ब्रिगेडच्या महिलांनी या वेळी पाळणा गीत म्हटले; तसेच शिवजन्मसोहळा महिलांनी मान्यवरांना सुंठवडा वाटून साजरा केला. या वेळी पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर शिवजन्मस्थळ ते शिवकुंजपर्यंत छत्रपती शिवरायांची पालखी आणण्यात आली. शिवकुंज येथे राजमाता जिजाऊ व बालशिवाजी यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मात्र सभेला उपस्थित राहण्याचा पायंडा मोडून मुख्यमंत्री मुंबईकडे रवाना झाले. मुंबईत ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना सहभागी व्हायचे होते. त्यामुळे ते तातडीने मुंबईला रवाना झाले, असे समजते.

या सोहळ्यास राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पर्यटन व रोजगार हमी योजनामंत्री जयकुमार रावल, आमदार आशिष शेलार,  आमदार शरद सोनवणे, शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव, कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, तहसीलदार किरणकुमार काकडे, गटविकास अधिकारी सतीश गाढवे, शिवजन्मभूमी संवर्धन समितीचे कार्यवाह रवींद्र काजळे, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र तांबोळी यांसह हजारो शिवप्रेमी, अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.   

सरकारसमोर शिवरायांचा आदर्श : मुख्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराज हे आपणा सर्वांचे आराध्यदैवत आहेत. जाणता राजा कसा असावा, हे छत्रपती शिवरायांनी त्यांच्या कर्तृत्वातून दाखवून दिले. शासन लोकाभिमुख करीत सर्व समाजांना सोबत घेऊन प्रगती कशी करावयाची, पर्यावरण, जल व गड, किल्ल्यांचे संवर्धन कसे करावे, याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. छत्रपती शिवरायांच्या आदर्श मार्गावर पाऊल टाकत राज्य सरकार प्रगतीकडे वाटचाल करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले शिवनेरीवरील हेलिपॅडवर बोलताना सांगितले.