Tue, Aug 20, 2019 04:58होमपेज › Pune › सी. पी. गोयंका स्कूलमधील तीन जणांना अटक

सी. पी. गोयंका स्कूलमधील तीन जणांना अटक

Published On: Mar 24 2018 1:52AM | Last Updated: Mar 24 2018 1:10AMपुणे : प्रतिनिधी

सी. पी. गोयंका इंटरनॅशनल स्कूलमधील सात वर्षांच्या ‘विशेष’ मुलाला लागणार्‍या विशेष सुविधा; तसेच शिक्षक न पुरवता त्याचा मानसिक व भावनात्मक छळ केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तिघांना अटक केली. तर, शाळेचा विश्‍वस्त गोयंकासह 9 जणांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. याप्रकरणात शिक्षण हक्क कायद्यांसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल आहे.  

कुमार मधुकर म्हामुणकर (वय 30, येरवडा), जसीता कुमार विल्सन (वय 42, खराडी) आणि शलीना शाहनवाज अडतानी (वय 32, रा. कल्याणीनगरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, याप्रकरणी शाळेचे विश्‍वस्त संदीप गोयंका, अर्चना गोयंका, शिक्षक मेघा दोडेजा, माजी मुख्याध्यापिका शेफाली तिवारी, रिमा खुराणा, निशा शहा, पूजा, सचिन व लिनाझ सुनावाला अशा तब्बल जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या 37 वर्षीय आईने फिर्याद दिली आहे. 

फिर्यादी यांचा 7 वर्षांचा मुलगा हा ‘विशेष’ आहे. त्यांनी प्रवेश घेतेवेळी मुलाबाबत माहिती दिली होती. त्यावेळी शाळेकडून त्याच्यासाठी विशेष सुविधा पुरवतो, त्यांच्यासाठी वेगळे शिक्षक व मानसोपचार तज्ज्ञाचीही मदत घेतली जाते, असे सांगण्यात आले. त्यामुळे शाळेत 1 लाख 18 हजार रुपये फी भरून प्रवेश घेतला. परंतु, त्याची पावती दिली नाही. मात्र, मुलाला विशेष सुविधा न देता त्याचा मानसिक व भावनात्मक छळ केला.

त्यामुळे मुलगा चिंता, नैराश्य, शाळेत जाण्यास टाळाटाळ करणे, एका विचित्र भीतीने ग्रासला असून, त्याचे पूर्ण शालेय जीवन उद्ध्वस्त झाले. पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणात शिक्षण हक्क कायद्यांसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु होता. पोलिसांनी शोध घेऊन या तिघांना शुक्रवारी अटक केली. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक मुकूंद महाजन यांनी दिली. 

शहरातला पहिला गुन्हा 

शिक्षण हक्क कायद्यानुसार गुन्हा दाखल होण्याची शहरातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान यामध्ये शाळेच्या विश्‍वस्तांसह 12 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी विश्‍वस्त संदीप गोयंका आणि अर्चना गोयंका यांचाही शोध सुरु असल्याचे सांगितले आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण आहे. मात्र, तरीही शाळेने पालकांकडून भरमसाट फी आकारली आहे. 

 

Tags : pune, pune news, CP Goenka International School, Mental and emotional persecution case, Three people arrested,