Thu, Apr 25, 2019 14:02होमपेज › Pune › ‘पुरंदर’ बनणार ‘नंबर वन’ कार्गो विमानतळ!

‘पुरंदर’ बनणार ‘नंबर वन’ कार्गो विमानतळ!

Published On: May 19 2018 1:35AM | Last Updated: May 19 2018 12:53AMपुणे : दिगंबर दराडे

रत्नागिरीचा हापूस, सांगलीची हळद  आणि पुण्यानजीकच्या फुलांना थेट जागतिक बाजाराचे दरवाजे खुले करणार्‍या पुरंदर येथील नवीन विमानतळातील ‘कार्गो’ देशात ‘नंबर वन’ असेल, असा विश्‍वास सिंगापूर येथील संचालक जेम्स टुंगटिंग लू यांनी ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केला.

विमानतळातील ‘कार्गो’ कसे असेल, याबाबत लू यांनी भूसंपादनापासून  तंत्रापर्यंतचे सर्व बाजूंना स्पर्श केला. ते म्हणाले, विमानतळाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने ‘चांगी’शी सामंजस्य करार केला आहे. जर्मनीच्या डॉर्श कंपनीकडून डीपीआर आणि तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता तपासली जात आहे. हा आराखडा ऑगस्टअखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. सविस्तर प्रकल्प आराखडा किंवा तांत्रिक-आर्थिक व्यवहार्य अभ्यासाचा अहवाल ‘चांगी एअरपोर्ट इंटरनॅशनल’कडे (सीएआय) आढाव्यासाठी येणार आहे. त्यानंतर त्यामध्ये आम्ही आवश्यक ते बदल करू. या विमानतळावरून विमानतळाच्या कॉरिडॉरमधून अन्नधान्य, भाजीपाला, फळे यांची निर्यात करणार्‍याला प्राधान्य देण्यात येणार असून, त्या अनुषंगानेच आम्ही नियोजन करीत आहोत.

असा आहे कॉरिडॉर 

या विमानतळाच्या कॉरिडॉरमध्ये येणार्‍या सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, रत्नागिरी, अहमदनगर या जिल्ह्यांना फायदा होणार आहे.  प्रामुख्याने सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यातील साखरेच्या निर्यातीला चालना देण्याचा सरकारचा मानस आहे. याचबरोबर रत्नागिरीच्या हापूस आंब्यालादेखील अमेरिका, युरोप, सिंगापूर या देशात फार मोठी मागणी आहे. पुण्यानजीकच्या या फुलांची निर्यातदेखील जगामध्ये होते. यामध्ये जरबेरा, गुलाब, गुलछडी, कार्नेशियन आदी फुलांचा समावेश आहे.

सिंगापूर कंपनी हे काम करणार

पुरंदर विमानतळाला ग्रीन सिग्‍नल मिळाल्यानंतर मोठी स्कॅन मशिन, कोल्ड स्टोरेज  उपलब्ध करून देणार्‍यावर सिंगापूर कंपनीचा भर राहणार आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय विमानसेवेतून कार्गो जाणार असेल तर त्यासाठी कस्टम सुविधा दिली जाणार आहे. विमानतळावर फळे, भाज्या, फुले,  वाइन यांची हाताळणी करण्यासाठी शीतकरण सुविधा असणार आहे. शिवाय सोने, चांदी, रत्ने यांच्या आयात-निर्यातीसाठीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विमानतळावर रशियन एएन 124 जातीचे सर्वात मोठे कार्गो विमान देखील उतरविले जाणार आहे.  हा विमानतळ अहोरात्र वापरणे शक्य आहे.

असा होईल फायदा

हिंजवडी, चाकण, मगरपट्टा या परिसरात आयटी हब मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अहमदाबाद येथील सरदार वल्लभाई पटेल विमानतळ 518 किलोमीटर आहे, तर नागपूर विमानतळ 625 किलोमीटरवर आहे. हैदराबाद येथील राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट 625 किलोमीटर आहे. गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ 357 किलोमीटर आहे, तर  बंगळुरू येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ 734 किलोमीटर आहे. या आंतरराष्ट्रीय विमानतळांपर्यंत पोहोचण्यास काही तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे पुरंदर विमानतळ सातारा, सांगली,  सोलापूर, कोल्हापूर, नगर, रत्नागिरी, बीड या भागासाठी तुलनेने जवळ आणि सोयीचे ठरणार असल्याने येथील फळे, पिके, भाजीपाल्याला आंतरराष्ट्रीय मार्केट सहजपणे उपलब्ध होण्यास मदत मिळेल. 

विमानतळाजवळ लॉजिस्टिक पार्क

निर्यातीसाठी मोठ्या कोल्ड स्टोअरेजबरोबर शेकडो एकरमध्ये लॉजिस्टिक पार्कही उभारण्यात येणार आहे. कॉरिडॉरमधून येणारा सर्व माल अ‍ॅटोमॅटिक सिस्टिमच्या माध्यमातून याठिकाणी साठविला जाईल आणि येथून त्याची थेट परदेशात निर्यात होईल. याचबरोबर नाशवंत पदार्थ हाताळण्यासाठी विमानतळाजवळ अत्याधुनिक पद्धतीची यंत्रणा उभारण्यात येणार आहे.