Sat, Jun 06, 2020 07:05होमपेज › Pune › गॅस गळतीमुळे कार पेटली; महिलेचा भाजून मृत्यू

गॅस गळतीमुळे कार पेटली; महिलेचा भाजून मृत्यू

Published On: Sep 11 2018 1:40AM | Last Updated: Sep 11 2018 12:30AMपिंपरी : प्रतिनिधी

गॅस गळतीमुळे पेटलेल्या कारमध्ये अडकल्याने एका महिलेचा भाजून मृत्यू झाला. ही धक्‍कादायक घटना रविवारी (दि. 9) मध्यरात्री एकच्या सुमारास वाकड येथील भूमकर चौकाजवळ सेवा रस्त्यावर घडली.  

संगीता मनीष हिवाळे (44, रा. सौंदर्य कॉलनी, रहाटणी) असे आगीमध्ये होरपळून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. जॉन डॅनियल बोर्डे (वय 40) असे जखमी झालेल्या भावाचे नाव आहे. जखमी जॉन यांनी संगीता यांचा मुलगा सायमन (वय 15) आणि त्यांची आई माया (वय 65) या दोघांना वेळीच बाहेर काढल्याने त्यांचे जीव वाचले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री संगीता यांच्या छातीमध्ये दुखू लागल्याने त्यांना वाकड येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. या वेळी त्यांच्यासोबत आई, भाऊ आणि मुलगा देखील कारमध्ये होते. वाकड येथे डॉक्टर नसल्याने त्यांना थेरगाव येथे घेऊन जात होते. दरम्यान, वाकड येथील भूमकर चौकाजवळ आल्यानंतर त्यांच्या कारने अचानक पेट घेतला. जॉन यांनी प्रसंगावधान राखून त्यांची वृद्ध आई आणि भाच्याला बाहेर खेचले. संगीता यांना देखील वाचविण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत आगीचा भडका उडाला होता. गाडीने पूर्णपणे पेट घेतल्याने जॉन यांना संगीताला बाहेर काढता आले नाही. त्यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. मात्र, पोलिस घटनास्थळी दाखल होईपर्यंत संगीता यांचे शरीर पूर्णपणे भाजले होते.

काही वेळाने अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. कारमधील हिटिंग केबल व कनेक्शनमध्ये बिघाड  झाल्यामुळे कारला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे.
संगीता गेल्या अनेक वर्षांपासून रहाटणी येथे त्यांची आई माया बोर्डे यांच्याकडेच राहात होत्या. भोसरीतील एका कुरिअर कंपनीत काम करून त्या आपला उदरनिर्वाह चालवत होत्या. त्यांचा एकुलता एक मुलगा सायमन याच्यावर त्यांचे खूप प्रेम असल्याचे शेजार्‍यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. सायमनला नुकतेच काही दिवसांपूर्वी संगीता यांनी मोबाईल घेऊन दिला होता. संगीता यांचा स्वभाव मनमिळाऊ असल्याने त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्‍त केली जात आहे.