Sun, Apr 21, 2019 14:24होमपेज › Pune › पाठलाग करून 'ट्रॅफिक वॉर्डन'ची कार फोडली  

पाठलाग करून 'ट्रॅफिक वॉर्डन'ची कार फोडली  

Published On: Jun 28 2018 12:55PM | Last Updated: Jun 28 2018 12:55PMपिंपरी : प्रतिनिधी

रस्त्यावर उभे असलेल्या टोळक्याला हॉर्न मारल्याच्या रागातून टोळक्याने पाठलाग करून 'ट्रॅफिक वॉर्डन'ची कार फोडली. तसेच रस्त्यावर पार्क केलेली एक दुचाकी देखील पेटवून देण्यात आली. ही घटना बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास थेरगाव येथे घडली. 

या प्रकरणी बालाजी किसन सगर (३८,रा.इंद्रायणी नगर , थेरगाव) या 'ट्रॅफिक वॉर्डन'ने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सागर सातपुते यांच्यासह अन्य तीन जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

पोलिस उपनिरीक्षक हरीष माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, सगर रात्री घरी जात असताना रस्त्याच्या मधोमध सातपुते त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता. सगर यांनी हॉर्न वाजविल्‍याने त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. सगर यांनी कार मागे घेऊन दुसऱ्या रस्त्याने जात असताना पाठलाग करीत आलेल्या चौघांनी गाडीवर दगडफेक केली. सगर यांनी जीव वाचवण्यासाठी कार जागेवर सोडून पळ काढला. यावेळी टोळक्याने कारची तोडफोड केली तसेच शेजारी पार्क असलेली दुचाकी देखील पेटवून दिली. पोलिसांनी सातपुतेला ताब्यात घेतले असून, त्‍याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.