होमपेज › Pune › मतदारांना चांदीचा मुलामा दिलेली ताटे वाटप करण्याचा डाव उधळला

मतदारांना चांदीचा मुलामा दिलेली ताटे वाटप करण्याचा डाव उधळला

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 26 2017 12:29AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

जिल्ह्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी चांदीचे ताट वाटप करण्यासाठी घेऊन जात असताना उमेदवाराचे प्रचार साहित्य निवडणूक विभागाच्या पथकाने पकडले. हे साहित्य रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास गुजर- निंबाळकर वाडी येथे पकडण्यात आले. याप्रकरणी उमेदवारासह त्याच्या हस्तकावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गुजर निंबाळकरवाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार व्यंकोजी मारुती खोपडे व त्यांचा हस्तक केतन अशोक खोपडे, संजय नंदूशेठ निंबाळकर, सोमनाथ मारुती खोपडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गुजर निंबाळकर वाडी ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनील पटेकरी (53)यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात जानेवारी तसेच फेब्रुवारीमध्ये कार्यकाळ संपणार्‍या 99 ग्रामपंचायतीसाठी आज (मंगळवारी) मतदान होत आहे. या निवडणुकीची आचारसंहिता 17 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आलेली आहे. दरम्यान निवडणुकीत मतदारांना आकर्षीत करण्यासाठी प्रलोभन म्हणून उमेदवार खोपडे यांच्या मालकीच्या इनोव्हा कारमधून त्यांच्या हस्तकांकरवी चांदीचे पाणी दिलेली पुजेचे ताट वाटप करण्यासाठी घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले होते.

मिळालेल्या माहितीवरून खोपडे यांची इनोेव्हा ( एम एच 12 एमएफ 9495 ) ही कार पथकाने गुजर-निंबाळकर वाडीकडे जाणार्‍या रस्त्यावरील सोपाननगर येथे पकडली. त्यात खोपडे यांच्या नावाची भित्तीपत्रके मतदारांना प्रलोभन म्हणून वाटप करण्यासाठी चांदीचा मुलामा दिलेले पुजेची ताट मिळून आली. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.