होमपेज › Pune › डोळ्यातील पांढरा ठिपका असू शकतो कर्करोग

डोळ्यातील पांढरा ठिपका असू शकतो कर्करोग

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 21 2018 11:03PMपुणे : प्रतिनिधी

आपल्या चिमुकल्याच्या डोळ्यात पांढरा चमकणारा ठिपका असेल, डोळा सतत बारीक होणे आणि सूज येणे अशी लक्षणे असतील तर वेळीच सावध व्हा. कदाचित हा ‘रेटिनोब्लास्टोमा’ अर्थात डोळ्याचा कर्करोग असू शकतो. अशी लक्षणे दिसल्यास डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. या रोगाविषयी जनजागृती करण्यासाठी महिन्यात जागतिक रेटिनोब्लास्टोमा सप्ताह पाळण्यात येत आहे.

रेटिनोब्लास्टोमा (आरबी-दृष्टीपटलातील पेशींची सामान्य वाढ न झाल्याने होणारा डोळ्यांचा कर्करोग) हा नवजात आणि पाच वर्षांपर्यतच्या मुलांमध्ये होणारा जीवघेणा रोग आहे. तो एका किंवा दोन्ही डोळ्यांना होऊ शकतो.  त्याचे लवकर निदान झाल्यास उपचार होऊन त्यांची दृष्टी सुधारू शकते. विविध अभ्यास अहवालांतून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या रुग्ण बालकांचे भारतातील प्रमाण हे 1500 इतके आहे. तथापि, अनेक ठिकाणी अशा रुग्णांची नोंद न होण्याचे आणि त्यावर उपचारच न मिळाल्यामुळे निदान न होण्याचे प्रमाणही मोठे आहे. विशेषत: ग्रामीण भागात त्याविषयी खूपच कमी माहिती आहे. 

डोळ्यातील पांढरा चमकणारा ठिपका, सतत बारीक होणारे डोळे, सूज यासारख्या काही लक्षणांच्या आधारे त्याचे निदान होऊ शकते. हा पांढरा ठिपका काही दिवसांनंतर कायमस्वरूपी होऊन जातो. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पुढे वेदना होऊन डोळे लाल होतात आणि सूज येते. त्यावर वेळीच उपचार केले गेले नाहीत तर, हा कॅन्सर डोळ्याच्या बाहेरील भागात पसरतो. काही दिवसांनंतर तो मेंदूकडे किंवा शरीराच्या अन्य भागात जाऊन  धोका निर्माण करतो.  

पुण्यातील एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाच्या ऑर्बिट अँड ऑक्युलर ऑन्कॉलॉजी विभागाच्या सल्लागार, नेत्रशल्यचिकित्सक डॉ. सोनल चौगुले यांच्या मते, रेटिनोब्लास्टोमाविषयी जनजागृती खूपच कमी आहे. डोळयात पांढरा ठिपका असल्याचे दिसल्यास लवकर निदान आणि योग्य उपचार यामुळे रुग्णाची दृष्टी आणि जीव वाचण्याची शक्यता 95 टक्के आहे. अनुवांशिक आजार  आरबी होईल. बहुतांश मुलांमध्ये आनुवंशिकतेने येतो. माता-पित्यांनी याविषयी माहिती घ्यावी. त्यामुळे त्यांच्या मुलांना वेळीच उपचार मिळू शकतील. त्याबरोबरच नवजात बाळाच्या दृष्टिपटलाचा फोटो घेऊन नेत्रतज्ज्ञांकडून या आजारांच्या लक्षणांबाबत खात्री करून घ्यावी.

लक्षणे :

एक किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये एक पांढरी चमक आढळणे (ल्यूकोकोरिया) डोळ्यांची भोवती आलेली सूज, डोळे लालसर होणे, तिरळेपणा 
कुटुंबातील व्यक्ती ओळखण्यास अडचण येणे, आनुवंशिकता.