Sun, Apr 21, 2019 02:15होमपेज › Pune › राज्यातील बोगस कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने रद्द करा : सदाभाऊ खोत 

राज्यातील बोगस कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने रद्द करा : सदाभाऊ खोत 

Published On: Jun 05 2018 1:28AM | Last Updated: Jun 05 2018 1:15AMपुणे : प्रतिनिधी

राज्यात खरीप हंगामात सुमारे 150 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्यांचे नियोजन केले आहे. बोगस बियाणे, बोगस खते, कीटकनाशके आदी कृषी निविष्ठांची विक्री होणार नाही, यासाठी राज्यभर कृषी विभागाकडून तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. विक्रेत्यांकडे परवानाव्यतिरिक्त कोणतीही कृषी निविष्ठा आढळल्यास त्यांचा परवाना तत्काळ रद्द केला जाईल आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

साखर संकुल येथे कृषी विभागाची राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्वतयारी बैठक सोमवारी (दि. 4) सकाळी झाली. बैठकीस कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांच्यासह कृषी संचालक प्र. ना. पोकळे, के. पी. मोते, विजयकुमार घावटे, सुभाष खेमनर, विस्तार सहसंचालक अनिल बनसोडे, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी सुभाष काटकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.  खोत म्हणाले, क्रॉपसॅप योजनेत कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊन मंडल कृषी अधिकार्‍यांबरोबर पिकांवरील  कीड, रोग सर्वेक्षणात भाग घेतील, याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गटशेती योजनांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी 11 जून रोजी पुण्यात यशदा येथे बैठक घेण्यात येत आहे.

राज्यात पिकनिहाय क्षेत्र पाहता कापूस, सोयाबीन प्रत्येकी 36 लाख हेक्टर, भात आणि तूर प्रत्येकी 16 लाख हेक्टर, मका 9.30 लाख हेक्टर, तेलबियांखाली 39.69 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या होतील, असे नियोजन केले आहे. गतवर्षी 36.58 लाख टन खतांचा पुरवठा करण्यात आला होता. त्यात वाढ करून केंद्राने खरीप हंगाम 2018 साठी सुमारे 40 लाख टन खतांचा पुरवठा मंजूर केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

कृषी विभाग जाणार शेतकर्‍यांच्या बांधावर...

चालू वर्षीच्या खरीप हंगामात राज्यातील कृषी विभाग शेतकर्‍यांच्या बांधावर पेरण्यांसाठी जाईल आणि त्यादृष्टीने मोठे अभियान राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. कृषिमंत्र्यांसह खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच व अन्य पदाधिकारी हे शेतावर जातील आणि पेरण्यांची माहिती घेतील, असेही खोत यांनी सांगितले.

खरीप पीक कर्जपुरवठ्यासाठी कक्ष उघडावेत

शेतकर्‍यांना खरिपात पीककर्ज पुरवठा वेळेत होण्यासाठी बँकांनी स्वतंत्र कक्ष उघडावेत.  कर्जमाफी मिळालेल्या शेतकर्‍यांना काही ठिकाणी फेर कर्जवाटप केल्याच्या तक्रारी येत आहेत. म्हणून यावेळी विभागवार बैठका घेण्यात येत आहेत.