Mon, Jun 24, 2019 16:38होमपेज › Pune › मुख्यमंत्री पुरग्रस्त सहायता निधी समितीची नोंदणी रदद

मुख्यमंत्री पुरग्रस्त सहायता निधी समितीची नोंदणी रदद

Published On: Mar 04 2018 1:40AM | Last Updated: Mar 04 2018 12:41AMपुणे : प्रतिनिधी

पानशेत धरण पुरग्रस्तांना आर्थिक मदत करण्यासाठी 1962 ला ‘मुख्यमंत्री पुरग्रस्त सहायता निधी समिती’ची नोंदणी धर्मादाय कार्यालयात करण्यात आली होती. त्या समितीचा उददेश पुर्ण झाल्याने आणि विभागीय आयुक्‍तांच्या विनंतीमुळे या समितीची नोंदणी धर्मादाय कार्यालयाने रदद केली आहे. 

1961 ला पानशेतचे धरण फुटल्यानंतर आलेल्या पुरामुळे पुण्यात एक हजार पुणेकरांनी प्राण गमावले होते तर हजारो नागरिक बेघर झाले होते.  त्यावेळी शासनाच्या आदेशाने या समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने अनेक दात्यांनी मदत निधी जमा केला. त्याद्वारे समितीने अनेक पुरग्रस्तांना मदत केली पण नेमकी किती जणांना मदत केली याचा तपशील उपलब्ध नाही. 

राज्याच्या धर्मादाय कार्यालयाने गेल्या वर्षी निष्क्रिय संस्थांची नोंदणी रदद करण्याचे अभियानाची घोषणा केली होती. यानंतर समितीची नोंद रदद करण्याचे पत्र विभागीय आयुक्‍त चंद्रकांत दळवी यांनी पुणे धर्मादाय कार्यालयाला दिले होते. या समितीच्या घटनेनुसार विभागीय आयुक्‍त आणि पुण्याचे महापौर हे पदसिध्द विश्‍वस्त आहेत. तर आणखी तिन विश्‍वस्त या समितीवर होते. साधारणतः 1990 पर्यंत या समितीद्वारे पुरग्रस्तांना मदत करण्यता आली. पण त्यानंतर कोणालाही मदत करण्यात आली नाही.

पदसिध्द विश्‍वस्त या नात्याने विभागीय आयुक्‍त दळवी यांनी धर्मादायला 19 डिसेंबर 2017 ला पत्र दिले. त्यामध्ये या समितीचे इतर विश्‍वस्त हयात नाहीत, समितीचा उददेश पूर्ण झाला आहे आणि नैसर्गिक आपत्‍तीग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीची स्थापना केली आहे. 

यामुळे हा न्यास चालविणे अशक्य असल्याने त्याची नोंद रदद करण्यात यावी असे म्हटले होते. त्यानुसार  विभागीय आयुक्‍त आणि पुण्याचे महापौर यांनी नाहरकत प्रमाणपत्र धर्मादाय कार्यालयास सादर केले. धर्मादायने निरीक्षकामार्फत चौकशी पूर्ण केली. त्यानंतर या समितीची धर्मादाय उपायुक्‍त एस. एम. गोडसे यांनी गेल्या महिन्यात 23 फेब्रुवारीला नोंदणी रदद केली. 

पाच कोटी 38 लाख निधी वर्ग

समितीच्या खात्यामध्ये सध्या पाच कोटी 38 लाख 86 हजार 966 रूपये इतका निधी जमा होता. कोणत्याही न्यासाची नोंद रदद करताना त्या न्यासाची मालमत्‍ता त्या न्यासाच्या विश्‍वस्तांच्या इच्छेने दुस-या कार्यक्षम न्यासात वर्ग करण्यात येते. त्यानुसार समितीची नोंदणी रदद करण्याआधी सर्व निधी मुख्यमंत्री सहायता निधी या न्यासाला वर्ग करण्यात आला आहे.