Wed, Apr 24, 2019 20:03होमपेज › Pune › कमी दराने विक्री करणार्‍या व्यापार्‍यांचे परवाने रद्द करा : सुभाष देशमुख

कमी दराने विक्री करणार्‍या व्यापार्‍यांचे परवाने रद्द करा : सुभाष देशमुख

Published On: May 07 2018 5:36PM | Last Updated: May 07 2018 5:36PMपुणे : प्रतिनिधी

शेतमालाच्या हमीभावाबद्दल शेतकर्‍यांना माहिती करून देणे हे बाजार घटकांसह प्रशासनाचे काम आहे. हमीभावापेक्षा कमी दराने विक्री केल्याची तक्रार येऊनही कारवाई होत नसेल तर बाजार समिती प्रशासनावर कारवाई करून ती बरखास्त करण्यात येईल. शेतकर्‍यांची लूट होऊ नये यासाठी प्रशासन काम करत असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड होता काम नये. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची विक्री करणार्‍या व्यापार्‍याचे परवाने तात्त्काळ रद्द करा, असा आदेश महाराष्ट्र राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला. 

गुलटेकडी मार्केटयार्ड येथे सोमवारी आयोजित कार्यक्रमावेळी बाजारातील सर्व बाजारघटकांच्या समस्या देशमुख यांनी जाणून घेतल्या. त्यानंतर ते बोलत होते़  कार्यक्रमास, आमदार माधुरी मिसाळ, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, सभापती दिलीप खैरे, आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ,  पुना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल आदी उपस्थित होते. 

प्रशासनाने बाजार समितीची क्षमता व गरज ओळखून आवश्यकतेनुसार १२/१ ची तात्काळ परवानगी देणे आवश्यक असल्याचे सांगून देशमुख म्हणाले, १२/१ ची परवानगी देण्याचे अधिकार हे राज्य सरकारकडे ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा कष्टकर्‍यांसह व्यापार्‍यांनी सेस स्वरुपात दिलेल्या कष्टाच्या पैशांचा दुरूपयोग कशा प्रकारे होईल हे सांगता येणार नाही. परवानगी घेऊनसुध्दा गैरप्रकार होताना दिसतो. मात्र, या प्रकारांवर अंकुश ठेवायचा असले तर परवानगी देण्यासाठी ते राज्य सरकारकडेच ठेवणे गरजेचे आहे. ९९ वर्षांच्या करारावर बाजारातील गाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, सध्यस्थितीत करार नसतानाही काही व्यापारी बेकायदेशीर रित्या व्यापार करताना दिसत आहे. त्याकडे, प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. पुणे बाजार समिती हे महाराष्ट्रातील मॉडेल करणे गरजेचे आहे. जेणेकरून महाराष्ट्रात पुणे बाजार एकआदर्श निर्माण होईल.

बाजार आवारातील टपर्‍या हलविण्यासाठी १२/१ परवानगीची गरज लागत नाही. बाजार समिती प्रशासनाने नागरीकांची दिशाभूल थांबवून बाजारातील अनधिकृत टपर्‍यांवर त्वरीत कारवाई करणे आवश्यक आहे. टपर्‍यांची वाढ थांबविण्यासाठी ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. भाजीपाल्याच्या संदर्भात राज्यसरकारकडून विविध सूचनांचा अभ्यास करण्यात येत आहे. अद्याप नाशवंत मालाला हमीभाव नाही मात्र, उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव हा मिळाला पाहिजे. भविष्यकाळात त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येईल.

दरम्यान बाजार आवारातील रस्ते, धूळ, स्वच्छता आदी समस्यांवरही तात्काळ कार्यवाही करण्याची गरज आहे. बाजार समितीवर अनेक वर्षे प्रशासक आहे. सध्या प्रशासक दूर करून निवडणुकांची प्रक्रिया सुरु आहे़  त्यामुळे काही कालावधी लागेल़  पुणे बाजार समितीच्या प्रश्‍नांबाबत स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले.