Tue, Apr 23, 2019 06:20होमपेज › Pune › ‘दीनानाथ’ रुग्णालयाचा परवाना रद्द करा

‘दीनानाथ’ रुग्णालयाचा परवाना रद्द करा

Published On: Mar 18 2018 1:06AM | Last Updated: Mar 18 2018 12:31AMपुणे : प्रतिनिधी

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने डॉ. सतीश चव्हाण व तत्कालीन वैद्यकीय स्टाफ यांच्यावर आजतागायत गुन्हा दाखल केलेला नाही. त्या सर्वांवर गुन्हा दाखल करावा. तसेच, या रुग्णालयाचा परवाना तत्काळ शासनाने रद्द करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली.

संभाजी ब्रिगेडच्या वतीने रुग्णालयातील भोंदुगिरी थांबावी, यासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर प्रतीकात्मक जादूटोणा व तंत्रमंत्र आक्रमक आंदोलन केले. यात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, नगर जिल्हा सचिव टिळक भोस, सिद्धार्थ कोंढाळकर, जोतिबा नरवडे, नदीम शेख, भोंदूबाबाच्या वेशात सचिन जोशी, राजेश कदम, महात्मा फुले पत्रकार लेखक महासंघाच्या सरचिटणीस; तसेच क्रांतिज्योती बहुजन धर्मादाय संस्थेच्या उपाध्यक्षा सपना माळी, छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष राम घायतिडक, राजेंद्र पडवळ, छाया खैरनार, संगीता परिधान, सागर नायडू, नीलेश दाडके, मेघा कदम, शीतल हुलावळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉ. सतीश चव्हाण यांनी महिलेवर उपचार करण्यासाठी मंत्रतंत्राचा वापर केला. या भोंदुगिरीमुळे वेळेत उपचार न मिळाल्याने संध्या सोनवने या 24 वर्षीय विवाहितेला आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना बुधवारी (दि. 14) घडली होती. तीन दिवस लोटले तरी डॉ. चव्हाण व तत्कालीन वैद्यकीय स्टाफवर कोणतीही कारवाई झालेली नाही; तसेच पुणे पोलिस व सायबर सेल विभाग डॉ. सतीश चव्हाण यांना शोधून अटक करू शकलेले नाहीत. हा पोलिसांचा हलगर्जीपणा आहे.

राज्य सरकारने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा परवाना रद्द करावा; तसेच संबंधितांवर कारवाई करावी, रुग्णालयातील संबंधित दोषी प्रशासनावर मानवी हत्येसह अंधश्रद्धाविरोधी गुन्हा दाखल करून कठोर शासन झाले पाहिजे, राज्य सरकारने रुग्णालयास मिळणारे सर्व शासकीय अनुदान बंद करावे, मृत सोनवणे यांच्या मुलांना पालकत्व म्हणून रुग्णालयाने 50 लाख रुपये तातडीने मदत करावी, पुणे शहर व जिल्ह्यात सर्व रुग्णालयात अशासकीय सदस्यांची तातडीने नियुक्ती करून त्यांना हक्क अधिकार द्यावेत. त्याचबरोबर डॉ. चव्हाण यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र रद्द करून त्यांना तत्काळ अटक करावी. त्यांची कसून चौकशी करून शिक्षा द्यावी, अशी मागणीही संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी या वेळी केली.

 

Tags : pune, pune news, dinanath hospital, license, Cancel,