Fri, Apr 19, 2019 12:34होमपेज › Pune › फोनच्या ‘सीडीआर’ची पोलिसदलात धास्ती!

फोनच्या ‘सीडीआर’ची पोलिसदलात धास्ती!

Published On: Apr 25 2018 2:00AM | Last Updated: Apr 25 2018 1:45AMपुणे ः विजय मोरे

अति वरिष्ठांकडूनच खात्यातील कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) काढून त्यांच्यावर दहशत निर्माण  केली  जात असल्याचे उघडकीस येत असल्याने पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, टेलिग्राफ अ‍ॅक्टला धाब्यावर बसवून, ही हेराफेरी केली जात असल्याने अनेक अधिकारी आणि पत्रकार मोबाईलवरून थेट बोलण्याऐवजी व्हॉट्सअप कॉलवरूनच संभाषण करीत असल्याचे विचित्र चित्र पाहावयास मिळत आहे.

यासंदर्भात अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीवरून, अति वरिष्ठ अधिकार्‍यांना कोणाचेही मोबाईलवरून केलेल्या संभाषणाचे सीडीआर काढण्याचा अधिकार आहे. गुन्हेगारांचा मागोवा काढण्यासाठी साधारणतः या अधिकाराचा वापर केला जातो. एकीकडे शहरातील गुन्हेगारीचा आलेख वाढतच चालला आहे. गुन्हेगार आणि गँगस्टरची दहशतही वाढत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे अति वरिष्ठ या अधिकाराचा गुन्हेगारी रोखण्यासाठी वापर करतात की नाही, हा प्रश्‍न समोर आला आहे, तर दुसरीकडे खात्यातीलच सहकार्‍यांचे दूरध्वनीवरील संभाषण मिळविण्याच्या अति वरिष्ठांच्या या उपद्व्यापाने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

या संदर्भात उदाहरण देताना एका अधिकार्‍याने सांगितले की, ठाणे पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी रजनी पंडित या खासगी गुप्तहेर महिलेला अटक करण्यात आली होती, तेव्हा तिच्याकडे केलेल्या चौकशीत तिने लाखो रुपये घेऊन सीडीआर विकल्याचे उघड झाले होते. तिच्यावर ‘इंडियन टेलिग्राफ अ‍ॅक्ट’ 26, 467 ‘आय टी अ‍ॅक्ट’ 6672, 72 (अ), आयपीसी 467 (120 ब), 465, 468, 471 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

या पार्श्‍वभूमीवर शहर आणि जिल्ह्यातील काही वरिष्ठांनी मोबाईलवरून थेट बोलण्याचा धसकाच घेतला आहे. आपल्यावर कोणीतरी पाळत ठेवत आहे, आपला सीडीआर कोणीतरी काढतोय का? या भीतीने त्यांना त्रस्त केलेय. याबाबत एका अधिकार्‍याने प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, सन 1999 मध्ये ‘टेलिग्राफ अ‍ॅक्ट’ अस्तित्वात आला आहे. मात्र, हा कायदा आणि नियमांना सर्रासपणे धाब्यावर बसवून अति वरिष्ठ अधिकार्‍यांकडून आपल्याच खात्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांचे सीडीआर काढत, त्यांच्यावर एकप्रकारे दहशत निर्माण केली जात आहे. याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर करीत काही पत्रकारांवरही अति वरिष्ठांकडून पाळत ठेवली जात असल्याचेही या सूत्राने स्पष्ट केले.

दरम्यान, गुन्हेगारांचे सीडीआर काढण्याऐवजी अति वरिष्ठ खासगी व्यक्ती, पत्रकार, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचार्‍यांचेच  सीडीआर  काढले जात असल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करून, एका वरिष्ठाने सांगितले की, काही अधिकार्‍यांना आपले मोबाईल संभाषण टॅपिंग होत असल्याची भीती वाटत आहे. त्यामुळेच काही वरिष्ठ अधिकार्‍यांनी खरच संभाषण टॅपिंग होत आहे का? या दृष्टीने त्यांनी आपल्या खबर्‍यांमार्फत शोध घेण्यास सुरुवात केली आहे. अर्थात शहरातील पोलिसांतीलच या ‘गँगवॉर’मधून पुढे काय निष्पन्न होईल, याचीच चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

या सीडीआरच्या माध्यमातून खासगी स्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याचे सांगत, या सूत्राने सांगितले की, अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष निक्सन यांनाही खासगी स्वातंत्र्यावर गदा आणल्याबद्दल सर्वोच्च पदावरून डच्चू मिळाला होता. फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्गलाही नुकताच अमेरिकन सिनेटपुढे हजर राहून खुलासा करावा लगला आहे. अधिकार्‍यांना सीडीआर काढले जात असल्याची धास्ती वाटत असतानाच, त्यांनी हे ‘गुप्तहेर’ प्रकरण उघड केले तर शहरात दुसरे ‘वॉटर गेट’ प्रकरण घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.