होमपेज › Pune › चव घेउनच करा दुधी भोपळयाचे सेवन

चव घेउनच करा दुधी भोपळयाचे सेवन

Published On: Jun 22 2018 7:59AM | Last Updated: Jun 22 2018 7:59AMपुणे : प्रतिनिधी

दुधी भोपळयाचा रस पिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. पण यावरून दुधी भोपळा खायचा किंवा नाही तसेच त्याचा रस प्यायचा की नाही याबाबत मत मतांतरे उमटत आहेत. पण कडू दुधी भोपळा हा विषारी असून तो शरीरास घातक आहे. त्यापासून उलटया, जुलाब, रक्‍ताच्या उलटया असा त्रास होतोे आणि प्रसंगी मृत्यूही ओढवला जाउ शकतो, असे मत वैद्यकिय तज्ज्ञ व्यक्‍त करतात. 

दुधी भोपळयाचा एक ग्लास रस पिल्याने बाणेर येथील गौरी शहा या 41 वर्षीय उच्चशिक्षित महिलेचा मृत्यू झाला. यामुळे, हा मुददा ऐरणीवर आला आहे. याबाबत वैद्यकिय क्षेत्रात विचारणा केली असता केवळ दुधी भोपळाच नव्हे तर काकडी आणि त्याच वर्गातील इतर भाज्याही देखील धोकायक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी कोणतीही भाजी चिरल्यानंतरच तिची चव घेउनच खाने महत्वाचे असल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांनाही दुधी भोपळयाचा रस पिल्याने काही वर्षांपूर्वी जीवघेणा त्रास झाला होता. बांदेकर यांच्या मते तर कडू दुधी भोपळा हे एक प्रकारचे विषच आहे. त्यामुळे त्यांच्या पोटात रक्‍तस्त्राव होत होता आणि रक्‍ताच्या उलटया होत होत्या. असे त्यांनी एका खासगी वृत्‍तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

दुधी भोपळयामध्ये ब, क आणि के हे जीवनसत्व असतेे. त्याचबरोबर पोटॅशियम, मँगनीज यांच्यासह 90 टके पाणी असते. डीहायड्रेशन झाल्यास आणि पचनक्रियेत बिघाड झाल्यास सुरवातीला पथ्यकार आहार म्हणून याचा आयुर्वेदानुसार उल्‍लेख केला गेला आहे. दुधी भोपळयाचा रस घेतल्यामुळे त्रास झाल्याचा एकही रुग्ण आढळला नाही. पण, याबाबत आणखी शास्त्रीय अभ्यास करण्याची गरज असल्याचे मत पुणे जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण दरक यांनी व्यक्‍त केले.  

कडवट असेलतर त्यामध्ये विषारी द्रव्य असल्याने भाजी करू नये किंवा रसही घेउ नये. याबाबत तीन शोधनिबंधही प्रसिध्द झाले आहेत. तसेच वरून दिसायला चांगला असलेला भोपळा कडू असू शकतो. त्याचबरोबर चांगल्या दुधी भोपळयाचा रस हा जास्त वेळ ठेवला गेला तरी त्यामध्ये जंतू वाढ होते.  विक्रीला कसा ठेवतात. दुधी भोपळयाप्रमाणेच दोडका, पडवळ, काकडी या त्याच वर्गातील फळांचीही चव घेउनच ते खाणे गरजेचे आहे.   -डॉ. सोनल साळवी, औषधास्त्र विभाग, ससून रुग्णालय

मार्केटयार्डात रोज सहा टेंपोची आवक
गुलटेकडी मार्केटयार्डातील तरकारी विभागात दररोज दुधी भोपळ्याची 5 ते 6 टेम्पो आवक होत असून त्याच्या प्रतिकिलोस 10 ते 12 रुपये दर मिळत आहे. औषधी गुणधर्म असल्याने बहुतांश लोक भोपळ्याचा रस पितात.  त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा केमिकल इफेक्टही नसतो. दुधी भोपळयाचा विशेष वापर हा दालचा करण्यासह सुकी भाजी करण्यासाठी होत असल्याचे आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले.

खा, पण जपून!

  • भाजीसाठी किंवा रस पिण्यासाठी वापरला जातो
  • चांगल्या भोपळयाचा रस पिल्याने मधुमेह, ह्रदयविकार, यकृताचे आजार कमी होण्यास मदत.
  • कडवट भोपळयामध्ये ‘सायटोटॉक्सिक’ हे विषारी द्रव्य असते. 
  • कडवट रसामुळे उलटया- जुलाब, पोटातील रक्‍तस्त्राव तसेच रक्‍तदाब कमी होणे ही लक्षणे दिसून येतात.
  • कोणतीही उपचार पध्दती उपलब्ध नाही, लक्षणाप्रमाणे उपचार
  • कडवट चवीचा दुधी भोपळा खाउ नये.