Wed, Apr 24, 2019 21:46होमपेज › Pune › स्थानिक वृक्षांबरोबरच कॅक्टस्ला पसंती

स्थानिक वृक्षांबरोबरच कॅक्टस्ला पसंती

Published On: Jun 18 2018 1:11AM | Last Updated: Jun 17 2018 11:28PMपुणे : प्रतिनिधी

पावसाळ्यात अनेकजण  घरात, गच्चीत, परसबागेत किंवा ऑफिसमध्ये रोपे लावण्यासाठी उत्सुक असतात. यासाठी रोपवाटिकेतील योग्य प्रकारे वाढलेल्या रोपांना ग्राहक प्राधान्य देतात. सध्या ग्राहकांकडून स्थानिक शोभिवंत, देशी वृक्षवर्गातील आणि कॅक्टस वर्गातील रोपांना पसंती दिली जात आहे. अनेक ठिकाणी मातीशिवाय किंवा कोकोपीटमध्ये वाढणार्‍या, देखभालीला सोपी आणि विविध आकारातील आकर्षक कुंड्यांमध्ये उपलब्ध असणार्‍या रोपांची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. 

शहरात व्यावसायिक रोपवाटिकेबरोबरच अनेकांनी स्थानिक, देशी वृक्षाच्या रोपवाटीका सुरु केल्या आहेत. पारंपारिक कडुलिंब, वड, सप्तवर्णी, कांचन या झाडांच्या रोपांना अधिक मागणी आहे. फळझाडांमध्ये पेरू, करवंद, जांभूळ प्रकारातील रोपांना मागणी आहे. शोभिवंत झाडांमध्ये धायकी, तरवड, कानफुटी, चित्रक झाडांना मागणी असल्याची माहिती औंध येथे देशी व स्थानिक वृक्षांच्या जातीच्या रोपवाटीका चालविणार्‍या मानसी करंदीकर यांनी दिली. सध्या अनेक ग्राहक देशी व स्थानिक वृक्षांच्या लागवडीसाठी पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. रोपवाटीकेतील रोपांची दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गोवा आदी राज्यांतून आयात-निर्यात होत असते. ग्राहकांच्या मागणीनुसार दक्षिणेतूनही नारळ, पाम, आंबा आदी रोपांची आवक येथे होत असल्याचे करंदीकर  यानी सांगितले.

स्थानिक व देशी प्रकारच्या वृक्षांना अधिक मागणी

मागील दोन तीन वर्षांपासून सोशल मिडियाच्या माध्यमातून देशी झाडे लावा, पर्यावरण वाचवा, असे आवाहन करण्यात येत आहे. स्थानिक व देशी झाडांमुळे जैवविविधता टिकून राहते, असा दावा करण्यात येत असल्याने रोपवाटीकेतही शोभिवंत झाडांऐवजी देशी स्थानिक रोपांबाबत अधिक विचारणा होत असून त्यांची मागणीही अधिक आहे. देशी वृक्षांच्या रोपांमध्ये आंबा, वड, पिंपळ, शमी, हिरडा, बेहडा, करंजा, कळम, बोख, फणसाड, अंजणी, रोहन, पाईन यांना अधिक मागणी असल्याचे करंदीकर यांनी सांगितले. देशी प्रकारातील तरवड, चित्रक, कानफुटी रोपांवर फुलपाखरे, मधमाश्या बागडताना दिसतात त्यामुळे या झुडपांनाही मागणी आहे.

कॅक्टस प्रकारातील रोपांना पसंती

कमी जागा, कमी माती, कमी खत-पाणी, हाताळण्यास सोपी व आल्हाददायक वाटणारी रोपे म्हणून कॅक्टस प्रकारातील रोपांना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. या प्रकारातील रोपे डीश गार्डन, टेरिरियम यासाठी आकर्षक दिसतात. यांची किंमत पन्नास रूपयांपासून दोन हजार रूपयांपर्यंत आहे. या रोपांमध्ये बिनकाट्यांचे सक्युलन्टस् व काट्यांचे कॅक्टस या प्रवर्गातील देशी-विदेशी सुमारे 200च्या वर रोपे उपलब्ध आहेत. इचावेरिया, कोरफडमधील प्रकार, टिलेन्सिया, स्पॅनिश मॉस, डिस्केडिया, क्रिप्टॅन्थस, सीडम, इचावेरिया, लकी प्लॅन्ट म्हणून मागणी असलेला क्रॉसुला, सॅन्सेवेरिया तसेच नेचामधील पाच प्रकारचे अ‍ॅस्प्लेनियम, ट्रीफन, मेडन हेअर फन अशा रोपांना मोठी मागणी आहे.

आकर्षक कुंड्यांनाही मागणी

नवनवीन रोपांच्या लागवडीसाठी विविध आकारातील कुंड्याही ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. विविध प्राण्यांच्या आकारातील खारूताई, ससा, कासव, बदक आदी प्राणी पक्षांच्या आकारातील सिरॅमिक व प्लास्टीकच्या कुंड्यांच्या उत्पादनांनाही थेट रोपवाटिकेतच बाजारपेठ मिळाली आहे. अनेक रोपवाटिका चालकांनी पिशवितील मोठ्या रोपांच्या निर्मितीला फाटा देत, अशा आकर्षक कुंड्यांवर भर दिला आहे. रोपे खरेदीसाठी येणारा ग्राहक रोपांबरोबरच या आकर्षक कुंड्याही खरेदी करताना दिसतो.