Wed, Apr 24, 2019 07:29होमपेज › Pune › पीएमपीएलला सीएनजी दरवाढीचा फटका

पीएमपीएलला सीएनजी दरवाढीचा फटका

Published On: Jun 22 2018 2:05AM | Last Updated: Jun 22 2018 12:43AMपुणे : प्रतिनिधी

इंधनाचे वाढते दर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) तोट्यात अधिकच भर टाकत आहेत. 16 जूनपासून सीएनजी गॅसच्या दरात तीन रुपयांनी वाढ झाल्याने पीएमपीएल महामंडळाला दरदिवशी तब्बल दोन लाखांचा फटका सहन करावा लागत आहे. शहरातील विविध रस्त्यांवरुन महामंडळाच्या सीएनजी गॅसवर 1 हजार 224 बस धावत आहे. सर्व बसला मिळून दिवसाला तब्बल 65 हजार किलोंचा गॅसची आवश्यकता भासते.

शहरातील नागरिकांची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपीएलला मागील काही दिवसांपासून इंधन दरवाढीला सामोरे जावे लागले आहे. डिझेल दरवाढीनंतर आता सीएनजी गॅसची दरवाढ झाली आहे. दरवाढीमुळे डिझेलवर चालणार्‍या बससोबत गॅसवर चालविण्यात येणार्‍या बस फेर्‍यात महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढत असल्याने प्रवाशांमध्ये तिकीट दरवाढीच्या चर्चेला उधाण आले आहे. महामंडळाच्या ताफ्यातील 1 हजार 224 बसेस सीएनजी गॅसवर चालविल्या जातात. जुन्या दराप्रमाणे पीएमपीएलला सवलतीच्या दरात  पुण्यामध्ये सीएनजी गॅस 46 रुपये 30 पैसे प्रतिकिलो दराने वितरित केला जात होता. तर पिंपरी-चिंचवडमध्ये 45 रुपये 80 रुपये किलो प्रमाणे गॅस खरेदी केला जात होता. दरम्यान 16 जूनपासून सीएनजी गॅसमध्ये तब्बल तीन रुपयांची दरवाढ झाली आहे. त्यामुळे शहरात सीएनजी गॅसचा दर 49 रुपये 30 पैसे, तर पिंपरी-चिंचवडमध्ये सीएनजी 48 रुपये 80 पैसे दराने वितरित करण्यात येत आहे. पीएमपीएल महामंडळाला वाढलेल्या सीएनच्या गॅस दरामुळे प्रतिकिलो तीन रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे.