Wed, Aug 21, 2019 20:03होमपेज › Pune › धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 10:46PMपिंपरी : प्रतिनिधी

धनगर समाजाचा आरक्षण प्रश्न सोडवण्याच्या अंतिम टप्प्यात सरकार पोहचले आहे.  लवकरच हा प्रश्न यशस्वीरीत्या सोडविण्यात सरकारला निश्चित यश येईल. धनगर समाजास न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करु असे आश्वासन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. चिंचवड येथे सोमवारी कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पिंपरी-चिंचवड धनगर समाज महासंघाने धनगर आरक्षणाबाबत निवेदन दिले. या शिष्टमंडळात पिंपरी चिंचवड शहर धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष राजू दुर्गे, अशोक खरात, श्रीकांत धनगर, वीणा सोनवलकर, राजेंद्र घोडके, शिवाजी आवारे यांचा समावेश होता. 

महासंघाच्या वतीने दिलेल्या निवेदनात   धनगरांच्या आरक्षणाविषयी  सरकारने गांभीर्यने ओळखावे आणि धनगड व धनगर हा फरक नसून आरक्षण टाळण्यासाठी जाणून- बुजून पाडलेली एकाच समाजाची दोन नावे आहेत. मुळात धनगड ही जातच अस्तित्वात नसतांना धनगरांना या ड आणि र च्या उच्चार खेळीत खेळवले जात आहे. या आधीच्या सरकारने हेच करुन समाजास वेठीस धरले. त्यामुळे या वेळीच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला दूर  ठेऊन भाजपाला साथ दिली. 

आज मुख्यमंत्री म्हणून या समाजाला न्याय देणे हे आपले प्रथम कर्तव्य असले पाहिजे.  त्यासाठी आपण सनदशीर मार्गाने प्रयत्न करुन आगामी निवडणुकीआगोदर महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधवांना समाजाचे आरक्षण जाहीर करुन न्याय मिळवून द्यावा अशी नम्र विनंती करण्यात आली आहे.