Thu, Jul 18, 2019 10:20होमपेज › Pune › कार्यक्षम मनुष्यबळ नसल्याने सीआयडीला फटका 

कार्यक्षम मनुष्यबळ नसल्याने सीआयडीला फटका 

Published On: May 25 2018 1:20AM | Last Updated: May 25 2018 1:15AMपुणे : देवेंद्र जैन

पोलिस खात्याचे हृदय समजल्या जाणारा राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कार्यक्षम व कुशल मनुष्यबळ,  अत्याधुनिक तंत्रज्ञान, वाहने, चालक, छायाचित्रकार, रासायनिक तज्ज्ञ अशा अनेक बाबींच्या अभावाने बर्‍याच काळापासून ग्रासला आहे. 

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस मुख्यालय हे पुणे शहरात आहे. सद्यःस्थितीत येथे दोन अतिरिक्त पोलिस महासंचालक कार्यरत आहेत. त्या अनुषंगाने येथे काम करणारे बहुतेक अधिकारी हे शहरातूनच बदलून आलेले असतात. या विभागाला  राज्य सरकार, उच्च न्यायालय, मुख्यमंत्री अथवा पोलिस महासंचालक, हे कोणत्याही गुन्ह्यांचा तपास करण्याचा आदेश देऊ शकतात. अतिशय क्‍लिष्ट,  सामाजिक सलोख्याबाबतचे गुन्हे, कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या प्रकराणांचा तपास, तसेच न्यायालयाच्या आदेशावरून वेगवेगळ्या गुन्ह्यांचा तपास करण्याचे काम सीआयडीला करावे लागते.

गेल्या काही दशकांपासून येथे महिला कर्मचार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महिलांकडून कामे करून घेताना येथील अधिकार्‍यांना अनेक समस्या भेडसावत आहेत. येथे दाखल गुन्ह्यांचा तपास करताना अनेक वेळा महिलांना तपासासाठी बाहेरगावी पाठवताना बरेच प्रश्न निर्माण होत आहेत. तसेच शहरातून बदली झाल्यानंतर बहुतांश महिला सीआयडीला प्राधान्य देत आहेत. याचबरोबर अकार्यक्षम असलेले अनेक येथे काम करण्यास उत्सुक असतात. कारण इतर सरकारी कार्यालयांप्रमाणेच आठ तासांनुसार येथील प्रशासकीय काम चालते. यामुळे शहरातून बदली झाल्यावर येथेच बदली मागितली जाते. येथे काम करण्यासाठी नव्हे, तर पुण्यात राहण्यासाठी बदली करून घेण्याचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रलंबित असलेल्या मोठ्या गुन्ह्यांच्या तपासावर परिणाम झाल्याचे दिसते आहे.

खरेतर सीआयडीमध्ये कामाची व्याप्ती मोठी असल्यामुळे, येथे अनेकांना शिकण्यास मोठा वाव मिळतो. शक्यतो सीआयडीच्या तपासावर कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत नाही. त्या दृष्टीने येथे तरुण व कुशल अधिकारी सरकारने नेमावेत,  जेणेकरून हा विभाग ‘नॉन एक्झिक्यूटीव्ह’ पोस्टींग सदरात मोडला जाणार नाही. 

या विभागासाठी आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा पुरवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राज्य सरकारच्या या खात्याकडून मोठ्या कामाची कायम अपेक्षा असते. मात्र या खात्याला सर्वच बाबींची वानवा असते, त्याचा परिणाम रोजच्या कामावर होतो व दाखल गुन्ह्यांचा तपास वर्षानुवर्षे सुरूच राहतो. सद्यःस्थितीत सीआयडीकडे अण्णा भाऊ साठे महामंडळ घोटाळा, मोतेवार प्रकरण, सांगली येथील कोथळे खून, कोडोली येथे पोलिसांनीच टाकलेला दरोडा व आता कालपरवाचे अहमदनगर, केडगाव येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्याचे खून प्रकरण, अशा अनेक महत्त्वपूर्ण घटनांच्या तपासाची जबाबदारी आहे. 

अशा सर्व गंभीर घटनांचा तपास करत असताना या विभागाला अकार्यक्षम अधिकार्‍यांचा उपयोग मोठ्या प्रमाणात करता येत नाही. या स्थितीत सीआयडीची अवस्था ‘सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही’ अशी झाली आहे.